एम. पी आयोजित गाण्यांचा कार्यक्रम
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
संगीत मनांचा ठाव घेत..संगीत जे मनात रुंजी घालत.. गीत जे आपल्या ओठांवर सहज तरळत…असे गीतसंगीत जर कानावर पडले तर रसिक मंत्रमुग्ध झाल्या खेरीज राहत नाही. याचा अनुभव नुकताच अलिबागेत आला. एम .पी आयोजित आणि सिंगिंग स्टार्स संचलित गाणी मनामनातील हा जुन्या मराठी आणि हिंदी गीतांचा सुरेख आणि सुरेल नजराणा घेऊन आलेली संध्याकाळ अलिबागकरांनी अनुभवली.
अलिबाग शहरात गेली वर्ष करा ओकेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम पार पडले. यामध्ये विशेषतः जुन्या, नव्या हिंदी चित्रपट गीतांचा अधिक समावेश होता.
मराठी गीतांचे मोजकेच कार्यक्रम घेण्यात आले. एम.पी आयोजित गाणी मनामनातील या कार्यक्रमात देखील काही मोजक्याच हिंदी गीतांचा समावेश करण्यात आला होता. कार्यक्रमात अशा मराठी गीतांचा समावेश होता, की ती गाणी फार जुनी आणि क्वचितच कानावर पडत असतात. त्या मध्ये काय बाय सांगू..कस ग सांगू..तसेच लटपट लटपट, बुगडी माझी सांडली .. पदावरती जरातरीचा…बाई सुया घे ग.. दाभण घे…या अवीट गोडीच्या गीतांचा समावेश होता. उपस्थित रसिक प्रेक्षकांनी ही गाणी ऐकून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. या संगीत रजनीचा आस्वाद घेण्यासाठी राजकिय, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रातील मंडळी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ख्यातनाम गीतकार जगदीश खेबुडकर यांचे सुपुत्र मुकुल खेबूडकर यांनी ग साजणी..कुण्या नावाची..कुण्या राजाची..हे गीत सादर करून आपल्या वडिलांच्या गीताला उत्तम न्याय दिला. ज्येष्ठ गायिका माधुरी नाईक यांनी गणेश वंदना गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. रसिकांचा मिळालेला प्रतिसाद आणि त्यांच्या कडून मिळणारी दाद ही कार्यक्रमाची उंची वाढवत होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गाणारे हौशी कलाकार होते.
