अलिबाग : ग्रामदेवता काळंबादेवी मंदिराचे रुप पालटले


अलिबाग । सिद्धी भगत ।
अलिबागची ग्रामदेवता असलेल्या श्री काळंबा देवीच्या मंदिराचे नुतनीकरण करण्यात आल्याने मंदिराचे रुपचं पालटून गेलेले आहे. आधी छोट्या कौलारु राऊळात विसावलेली काळंबादेवी आता भव्य दिव्य मंदिरात स्थानापन्न झाली आहे.नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने काळंबीदेवीच्या मंदिराचे दरवाजे आता सर्वसामान्यांना उघडण्यात आलेले आहेत.

कान्होजी राजे आंग्रेंच्या काळात काळंबादेवीच्या मंदिराची स्थापना झाली. ही देवी अलिबागसह आजुबाजूच्या तालुक्यांमध्ये सुपरिचित आहे. तसेच या मांदिराचा इतिहासही आंग्रेंच्या काळापासूनच सुरू झालेला आहे. आंग्रेंच्या काळात नवगाव गावात एका मच्छिमाराच्या जाळ्यातकाळंबादेवीची पाषाण मूतीर्र् अडकली. या मुर्तीची स्थापना गावातील समुद्रकिनार्‍यावर वाळूत करुन त्या मुर्तीची पुजा अर्चा सुरू करण्यात आली. कान्होजी आंग्रेंचा या भागातील किनारपट्टीवरून नेहमी फेरफटका असायचा. ज्यावेळी आंग्रेंच्या ही मुर्ती नजरेस पडली त्यावेळी नवगाव गावातील कोळी बांधवाकडे मुर्तीबाबत विचारण करण्यात आली. त्यानंतर या मुर्तीच्या सुरक्षिततेसाठी या मुर्तीला अलिबागमधील हिराकोट किल्ल्यात आणण्यात आले व काळंबादेवीच्या मुर्ती विधीवत प्रतिष्ठापना करून पूजा अर्चा करण्यात आली. कोळी भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येऊ लागले. कालांतराने किल्ल्यात असलेल्या दारुगोळा साहित्यामुळे मुर्तीच्या व भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उद्भवला व देवीची मुर्ती किल्ल्यातुन हलवण्याचा पुनश्‍च निर्णय झाला.

काळंबादेवीच्या जागेसाठी किल्ल्यावरून धनुष्यबाण सोडण्यात आला व हा बाण शहरात ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी देवीची स्थापना होणार असे ठरवण्यात आले. ठरविल्याप्रमाणे किल्ल्यावरून धनुष्यबाण सोडण्यात आला व सोडलेला बाण आता ज्याठिकाणी काळंबादेवीचे मंदिर आहे त्या जागेवर येऊन पडला. हा बाण एका गुजराती व्यक्तीच्या जागेत पडला. आंग्रेनी बाण पडलेल्या ठिकाणी मंदिराचे बांधकाम केले व देवीची त्या मंदिरात पुन्हा घटस्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत देवीची पुजा व मंदिराचा सांभाळ रामनाथ मधील गुरव कुटूंब करत आले आहेत. नवरात्रोउत्सवामध्ये या देवळात देवीचा उत्सव साजरा केला जातो व हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी मंदिराला भेट देतात. अलिबागकरांची ग्रामदेवता असेही या देवीला संबोधले जाते.
नोव्हेंबर 20 पासून या मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरू असुन 170 वर्ष जुने मंदिर कवलारू व माती लाकडाचे होते व आता सिमेंटचे बांधकाम करण्यात आले आहे. जुना देवीचा गाभारा हा दीड फुट होता आता तो तीन फूट करण्यात आला आहे. लाकडी गाभारा बदलून तो स्टीलचा करण्यात आला आहे.

Exit mobile version