अलिबागकर अनुभवणार क्रीडा महोत्सवाचा थरार

25 फेब्रुवारीला मॅरेथॉन, कुस्ती, शरीरसौष्ठव स्पर्धा; 26 फेब्रुवारी रंगणार कबड्डीचे सामने

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

युवा शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत आणि बी.यू. प्रोडक्शन यांच्या सौजन्याने अलिबाग क्रीडा महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग बीच मैदानावर 25 आणि 26 फेब्रुवारी या दोन दिवशी क्रीडा महोत्सवाचा थरार अलिबागकरांना अनुभवता येणार आहे, अशी माहिती बी.यू. प्रोडक्शनचे उमेश यांनी दिली.

अलिबाग तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करता यावी यासाठी अलिबाग क्रीडा महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे हे पहिले वर्ष असल्याने यंदा मॅरेथॉन, सायकल स्पर्धा, कुस्ती, शरीरसौष्ठव आणि कबड्डी या पाच खेळांचा समावेश करण्यात आला आहे, श्री. कोळी यांनी सांगितले.

अलिबाग क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते 25 फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. 25 फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता मॅरेथॉन स्पर्धा घेतली जाणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेला रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अलिबाग नगरीच्या माजी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वाजता अलिबाग तालुक्यातील मल्लांच्या कुस्त्यांचा फड अलिबाग बीच मैदानावर रंगणार आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, तपोनिधी अरविंदनाथ महाराज, जयेंद्र भगत आणि माजी नगरसेवक प्रदीप नाईक हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये रायगड श्री चषक आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेला माजी आ. पंडित पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील, रघुजी राजे आंग्रे, संजय पाटील, उद्योजक राहुल पाटील, रोहन पाटील उपस्थित राहणार आहेत, असे उमेश कोळी यांनी सांगितले.

26 फेब्रुवारीला सकाळी अलिबाग किनार्‍यावर वाळूमध्ये सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, आंबेपूर सरपंच सुमना पाटील, अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, आरडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी अलिबाग तालुक्यातील पुरुष कबड्डी सामान्यांचा थरार पहावयास मिळणार आहे. या स्पर्धेसाठी आ. अनिकेत तटकरे, चित्रलेखा पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे उमेश कोळी यांनी सांगितले.

Exit mobile version