अलिबागकरांना सिलेंडरसाठी मोजावे लागणार 845 रुपये

38 हजार एलपीजीधारकांना फटका
। अलिबाग । वार्ताहार ।
महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. या कोरोनाच्या काळात सगळ्याच वस्तूंचे भाव गगनाला भिडत असताना एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरवाढीने त्यामध्ये आणखी भर घातली आहे. भाजीपाला, पेट्रोल आणि डिझेलचे दर आधीच इतके वाढले असताना, आता सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या किंमतीही वाढवल्या आहेत. 14 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात 25 रुपये 50 पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता अलिबागकरांना घरगुती अनुदानित एलपीजी सिलिंडरसाठी 820 ऐवजी 845 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत.

सगळ्याच्याच किंमती वाढलेल्या असताना आता आधीच महाग असलेला एलपीजी गॅस सिलिंडर आणखी वाढल्याने ग्राहकांची तारांबळ उडालेली दिसून येत आहे. बहुतांश, महिलांकडून आता दुष्काळात तेरावा महिना… अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. एप्रिल महिन्यात 10 रुपयांनी सिलिंडरचे दर कमी करण्यात आले होते. तर, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये हे दर वाढले होते. दरम्यान, या वर्षभरात एलपीजी सिलिंडरच्या दरात एकूण 140 रुपयांची वाढ झाली आहे.

Exit mobile version