अलिबागची ‘गूज’ राज्यात भारी

एकांकिका स्पर्धेची गाठली अंतिम फेरी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत अलिबागची गूज एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या स्पर्धेची अंतिम फेरी पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रंगणार आहे. अलिबागची (रायगड केंद्र), फ्रायडे फिल्म्स प्रोडक्शन आणि निषाद एंटरटेनमेंटची निर्मिती असलेली एकांकिका गूज सर्वोत्तम ठरली आणि सोबत अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. ज्योती राऊळ आणि किरण साष्टे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या एकांकिकेचे लेखन चैताली गानू यांचे असून, दिग्दर्शन किरण विजय साष्टे यांनी केले आहे. तांत्रिक बाजू संकल्प केळकर, सायली हेंद्रे, विवेक म्हात्रे आणि गार्गी केळकर यांनी उत्तम सांभाळली आहे. एकांकिकेची सर्वात जमेची बाजू असलेल्या संगीताची मोठी जबाबदारी तरंग साष्टे याने आपल्या खांद्यावर घेतली आहे. गीतलेखन राहुल साळवे यांचे असून, पार्श्‍वसंगीताची बाजू विक्रांत वार्डे यांनी उत्तम सांभाळली आहे. या यशाबद्दल एकांकिकेच्या सर्व टीमला अलिबागकरांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Exit mobile version