| अलिबाग | प्रमोद जाधव |
थोर पुरुषांबद्दल अपशब्द प्रकरणी रविवारी रात्रीपासून अलिबाग शहरासह संपुर्ण जिल्ह्यात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. सामाजिक तेढ निर्माण होईल असे विविध मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल होत होते. याबाबत वेळीच दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सायबर सेलच्या मदतीने ग्रुप ॲडमिनलाच पोलिसी खाक्या दाखविला. त्यानंतर पुढील काही तासातच सर्व ग्रुपवरील मेसेज आणि पोस्ट व्हायरल होण्याला ब्रेक बसला.
वेगवेगळया प्रकारचे मेसेज सोशल मिडीयामार्फत व्हायरल झाले होते. सोशल मिडीयावरील व्हायर मेसेजमुळे जातीय कलह वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. 40 व्हॉट्सॲप ग्रुप सक्रीय होते. त्यापैकी 17 व्हॉट्सॲप ग्रुप एका तासात निर्माण झाले होते.एका ग्रुपमध्य एक ते दीड हजार सदस्य जोडले गेले होते. त्यांच्यामार्फत समाजात तेढ निर्माण होईल असे मेसेज आणि पोस्ट मोठ्या संख्येने व्हायरल होत होत्या.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सतर्कता दाखवत सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने सोशल मिडीयावर पाठविण्यात आलेल्या मेसेजची तपासणी केली. सोशल मिडीयातील ग्रुप ॲडमिनचे नंबर सायबर गुन्हे शाखेच्या टीमच्या सहाय्याने प्राप्त करून त्यांच्याशी संपर्क साधला. पोलीसी दणका देत मेसेज टाकणाऱ्यांवर अंकूश ठेवण्यासाठी ग्रुप ॲडमीनशी मोबाईलवर संवाद साधला. पोलिसांनी केलेल्या या उपक्रमामुळे सोशल मिडीयावर व्हायरल होणारे मेसेज बंद झाले.