अलिबाग: जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी

पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल

| अलिबाग | प्रतिनिधी |

जमिनीच्या वादातून मुनवली येथे दोन गटात हाणामारी झाली. त्यामध्ये चौघेजण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुनवली येथील शेतजमिनीचा वाद दोन गटात गेल्या अनेक वर्षांपासून सुुरू आहे. चेतना पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी मुनवली येथील शेतामध्ये भाताची लागवड केली होती. मनोज रेडीज याच्यासह कुुक्कुच कू पोल्ट्री फार्ममधील सुमारे 35 जण त्याठिकाणी येऊन त्यांनी लागवड केलेल्या भातशेतीचे नुकसान केले. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी चेतना पाटील व त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करून जखमी केले. यामध्ये 1 लाख 38 हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज कोणीतरी घेऊन पळाले असल्याची तक्रार पाटील यांनी केली.

माधवी पाथरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कुटुंबियासह कामगारांसमवेत शेतामध्ये काम करीत असताना चेतना पाटील यांच्यासह 11 जणांनी येऊन शिवीगाळी करून काठी, हाताबुक्क्याने मारहाण केली. त्यामध्ये मनोज रेडीज जखमी झाले असून, त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास करण्यात आली आहे. या दोन्ही घटना रविवारी सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घडल्या असून, दोन्ही गटातील चौघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात सायंकाळी एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चेतना पाटील यांनी मनोज रेडीज यांच्यासह अनेकांविरोधात तर माधवी पाथरे यांनी पाटील कुटुंबियासह अन्य व्यक्तींविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे करीत आहेत.

Exit mobile version