अलिबागचे सायकलस्वार पंढरीच्या वाटेवर

व्हर्च्युअल चॅलेंज यशस्वी पूर्ण; श्रीक्षेत्र पंढरपूरच्या सायकल रिंगणात सहभागाचा मान

| अलिबाग | प्रतिनिधी |

विठ्ठलाच्या भक्तीची ओढ, सायकलिंगची आवड आणि फिटनेसचा ध्यास यांचा सुंदर संगम साधत असोसिएशन ऑफ सायकल रायडर्स, अलिबागचे चार सायकलस्वार सलग दुसऱ्या वर्षी अलिबाग ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशी सायकल वारी करत आहेत. पंढरपूर सायकल वारी ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एप्रिल ते जून 2026 व्हर्च्युअल चॅलेंजमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत त्यांनी सायकल रिंगणात सहभागी होण्याचा मान पटकावला आहे.

या चॅलेंजमध्ये सलग तीन महिन्यांच्या कालावधीत किमान 60 दिवस सायकल चालविणे आणि एक हजार किलोमीटरचे अंतर पूर्ण करणे बंधनकारक होते. असोसिएशन ऑफ सायकल रायडर्स, अलिबागचे अध्यक्ष अनिरुद्ध आठवले, उपाध्यक्ष रविकिरण आवले, राम जोशी आणि संजीत बागवाले यांनी हे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण करून आपला ठसा उमटवला.

या यशस्वी सायकलस्वारांना रविवार, दि. 12 जुलै 2026 रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या सायकल रिंगण सोहळ्यात सहभागी होण्याचा विशेष सन्मान मिळाला आहे. त्यासाठी गुरुवार, दि. 9 जुलै रोजी अनिरुद्ध आठवले, रविकिरण आवले, संजीत बागवाले आणि किशोर शिलधनकर यांनी अलिबाग येथून पंढरपूरकडे सायकल प्रवासाला सुरुवात केली.

या वारीचा पहिला मुक्काम पुणे, दुसरा फलटण, तर तिसरा मुक्काम श्री क्षेत्र पंढरपूर येथे आहे. रिंगण सोहळा पार पडल्यानंतर परतीचा प्रवास श्री क्षेत्र गोंदवले, पुणे आणि त्यानंतर अलिबाग असा नियोजित करण्यात आला आहे.

पाऊस, वारा, लांबचा प्रवास आणि शारीरिक कष्ट यांची पर्वा न करता विठ्ठलनामाचा गजर करत हे सायकल वारकरी पंढरीच्या वाटेवर मार्गक्रमण करत आहेत. श्रद्धा, शिस्त, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही सायकल वारी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विशेष म्हणजे, अलिबाग ते पंढरपूर अशी सायकल वारी करण्याचे हे सलग दुसरे वर्ष असून, विठ्ठल भक्तीचा हा अनोखा प्रवास दरवर्षी अधिकाधिक सायकलप्रेमींना आकर्षित करत आहे.

विठ्ठल भक्ती, सायकलिंगची आवड आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. व्हर्च्युअल चॅलेंज पूर्ण करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असून, श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सायकल रिंगणात सहभागी होण्याची संधी मिळणे हे भाग्य समजतो. पाऊस, वारा आणि लांबचा प्रवास यांची पर्वा न करता विठुरायाच्या नामस्मरणात ही वारी करत आहोत. सलग दुसऱ्या वर्षी अलिबाग ते पंढरपूर सायकल वारी करण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. भविष्यात अधिकाधिक युवकांनी अशा उपक्रमात सहभागी व्हावे, हीच अपेक्षा आहे.

अनिरुद्ध आठवले,
अध्यक्ष, असोसिएशन ऑफ सायकल रायडर्स, अलिबाग
Exit mobile version