चौल-रेवदंड्यातील सायकलस्वारांची ऐतिहासिक कामगिरी
| चौल | प्रतिनिधी |
वारी म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचा महामेळा… पण याच वारीला साहस, जिद्द आणि फिटनेसची जोड देत रेवदंडा कोस्टल पेलोटन सायकलिंग क्लबच्या पाच सायकलवीरांनी एक ऐतिहासिक पराक्रम गाजवला आहे. इंडियन ॲथलेटिक सोसायटी आयोजित दहाव्या पुणे-पंढरपूर सायकलवारी 2026 मध्ये सहभागी होत त्यांनी देहू-आळंदी ते पंढरपूर हे तब्बल 235 किलोमीटरचे अंतर एका दिवसात पूर्ण केले. विशेष म्हणजे, रेवदंडा परिसरातून सायकलवरून पुणे-पंढरपूर वारी यशस्वीपणे पूर्ण करणारे हे पहिलेच मानकरी ठरले असून, त्यांच्या या कामगिरीने संपूर्ण रेवदंडा-चौल परिसराचा मान उंचावला आहे.
या सायकल वारीत शेतकरी कामगार पक्षाचे रेवदंडा शहर चिटणीस निलेश खोत, मिलिंद वैती, संदीप मोरे, रायगड डाक विभागाचे अधीक्षक सुनील थळकर आणि चौलमळा गावचे गावप्रमुख रवींद्र घरत यांनी सहभाग घेतला होता. विठ्ठलाच्या नामस्मरणात, हजारो वारकऱ्यांच्या उत्साहात आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या सायकलस्वारांनी अवघड वाटचाल पूर्ण केली.
वारीदरम्यान मिलिंद वैती आणि सोनाली वैती यांनी सपोर्ट व्हेईकलसह संपूर्ण प्रवासात सायकलस्वारांना मोलाची साथ दिली. आवश्यक तेथे मदत, मार्गदर्शन आणि सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळत त्यांनी या मोहिमेच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. वारीसाठी रवाना होण्यापूर्वी रेवदंडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष मोरे यांनी नारळ वाढवून सायकलस्वारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संदीप खोत, सुदेश माळी, अरुण विचारे, राकेश मुकादम, समीर वर्तक आणि सुरेश खोत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विठ्ठलभक्ती, साहस, शिस्त आणि सामाजिक एकोप्याचा अनोखा संगम घडवणारी ही सायकल वारी रेवदंडा-चौल परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे परिसरातील युवकांमध्ये सायकलिंगबाबत प्रेरणा निर्माण झाली असून, सर्व स्तरांतून या सायकलवीरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुणे-पंढरपूर सायकल वारी हा आमच्यासाठी केवळ सायकलिंगचा प्रवास नव्हता, तर तो श्रद्धा, जिद्द आणि आत्मविश्वासाचा एक अविस्मरणीय अनुभव होता. देहू-आळंदी ते पंढरपूर हे 235 किलोमीटरचे अंतर पूर्ण करताना विठ्ठल नामाचा गजर आणि वारकऱ्यांचा उत्साह आम्हाला सतत प्रेरणा देत होता. रेवदंडा परिसरातून अशी वारी पूर्ण करणारे पहिले सायकलस्वार असल्याचा आम्हाला अभिमान आहे. या यशामागे आमच्या सर्व सहकाऱ्यांची मेहनत, कुटुंबीयांचे पाठबळ आणि सपोर्ट टीमचे मोलाचे सहकार्य आहे. भविष्यात अधिकाधिक युवकांनी सायकलिंगकडे वळावे आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी, हाच आमचा प्रयत्न राहील.
निलेश खोत
(सायकलस्वार)
विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ आणि सायकलिंगची आवड यांचा सुंदर संगम म्हणजे ही पुणे-पंढरपूर सायकल वारी. 235 किलोमीटरचा प्रवास निश्चितच आव्हानात्मक होता, मात्र मनात विठुरायाचे नाव आणि सहकाऱ्यांचे बळ असल्यामुळे हे अंतर सहज पार करता आले. हजारो वारकऱ्यांसोबत चालताना भक्ती, शिस्त आणि समर्पणाचा अनोखा अनुभव मिळाला. रेवदंडा कोस्टल पेलोटनच्या माध्यमातून आम्हाला ही ऐतिहासिक वारी पूर्ण करण्याची संधी मिळाली, याचा आनंद आणि अभिमान आहे. या यशामुळे परिसरातील युवकांना सायकलिंग आणि आरोग्यदायी जीवनशैलीची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा आहे. भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन चौल-रेवदंडाचे नाव राज्यभर पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील.
रवींद्र घरत
(सायकलस्वार)






