बोलेरो पिकअपसह ओंडके जप्त
| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन रोडवरील धनगरमलई परिसरात खैराच्या लाकडांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपवर दिघी सागरी पोलिसांनी कारवाई केली. गस्तीदरम्यान संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये खैराच्या लाकडाचे सुमारे 30 ते 32 ओंडके आढळून आले. पोलिसांनी वाहनासह दोघांना ताब्यात घेतले असून, जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मेंदाडकर हे पोलीस पथकासह धनगरमलई परिसरात गस्त घालत असताना एमएच 05 ईएल 0916 क्रमांकाची बोलेरो पिकअप संशयास्पदरीत्या आढळून आली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तीन ते चार फूट लांबीचे खैराच्या लाकडाचे अंदाजे 30 ते 32 ओंडके आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी विठ्ठल भिकू हिलम (29, रा. साई-काकळ, ता. माणगाव) आणि तुषार विनोद जाधव (22) रा. खामगाव, ता. म्हसळा यांना ताब्यात घेतले.पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून खैराच्या लाकडांसह बोलेरो पिकअप ताब्यात घेतली. दोन्ही संशयित तसेच जप्त मुद्देमाल पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. दिघी सागरी पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर वृक्षतोड आणि लाकूड वाहतुकीवर अंकुश ठेवण्यास मदत होणार असून, अशा प्रकारांविरोधात पोलीस व वनविभागाने कारवाईची धडक मोहीम सुरू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





