राजकीय दबावाची चर्चा
| पेण | प्रतिनिधी |
मयूर वनगे यांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणाला दहा दिवस उलटूनही चारही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील पोलीस तपासाबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप वाढल्याची चर्चा सध्या सुरू आहे. राजकीय दबावामुळेच आरोपींना अटक होत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
दैनिक कृषीवलच्या हाती लागलेल्या छायाचित्रांवरून मयूर वनगे यांना झालेल्या दुखापतीचे गांभीर्य स्पष्ट होत असून, त्यांच्यावर अत्यंत क्रूर पद्धतीने मारहाण करण्यात आल्याचे दिसून येते. या मारहाणीची दृश्ये पाहता, घटनेचे गांभीर्य अधिक प्रकर्षाने जाणवते. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून भाजप जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी, हरेश दळवी, रुपेश दळवी तसेच पूल अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी रंजीत दळवी यांची नावे चर्चेत आहेत. हे आरोपी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, गंभीर स्वरूपाची मारहाण झाल्याचा आरोप असताना आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती न लागल्याने तपासाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नसून तपास निष्पक्षपणे सुरू आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीन मिळतो की त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मयूर वनगे यांच्यावर झालेल्या मारहाणीचे गांभीर्य आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेता न्यायालय याप्रकरणी कोणता निर्णय देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






