अलिबाग: डिझेल तस्करी करणारे गजाआड

| अलिबाग | प्रतिनिधी |

अवैधरित्या डिझेलची तस्करी करणाऱ्यांना रायगड पोलिसांनी गजाआड केले. हा छापा रेवस खाडी जवळ पकटी याठिकाणी टाकण्यात आला असून त्यांच्याकडून बोटीसह 1 कोटी 3 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापुर्वीदेखील रायगड पोलीसांनी कारवाई करीत डिझेल तस्करी करणाऱ्यांना रोखले होते. तरीदेखील जिल्ह्यात अवैध डिझेल तस्करी होत असल्याने हा धंदा राजरोसपणे नक्की कोणाच्या कृपेने सुरु असल्याचा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनानुसार रसायनी पोलीसांनी 8 ऑगस्ट रोजी रेवस येथील पकटीजवळ उभ्या असलेल्या दोन बोटीवर छापा टाकला. या बोटीमध्ये 18 हजार लिटर व 28 हजार अशा एकूण 46 हजार लिटर डिझेलचा साठा आढळून आला. या गुन्हयातील जियाउल्लख असरावली शेख, राजू महतो, कमल बर्मन, पुनित उरा, बिनेय गुरी, प्रेेम महतो यांच्यासह नऊ जणांना ताब्यात घेतले असून बोट व डिझेल जप्त केला आहे.

रेवस बंदर पर्यटन व जलवाहतुकीच्या दृष्टीने उदयास येत असताना या बंदरालगत पकटीच्या ठिकाणी खाडीजवळ डिझेल तस्करीला उत येत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. मांडवा पोलीस ठाणेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या बंदरानजीक असे अवैध धंदे सुरु असल्याने मांडवा पोलीसांच्या कामकाजाबाबत नाराजीचे सुर उमटत आहेत.

Exit mobile version