अलिबागचे जिल्हा रुग्णालय नवीन जागेत बांधा- आ.जयंत पाटील

| मुंबई | प्रतिनिधी |

अलिबागमधील जिल्हा रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली आहे. तरीही देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात ते तातडीने बंद करुन सरकारने कृषी विभागाच्या जागेत रुग्णालयाची अद्ययावत अशी वास्तू उभारावी, अशी मागणी शेकापचे आ.जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केली.

मंगळवारी या मुद्यावर बोलताना जयंत पाटील यांनी रोखठोक भूमिका मांडली. ते म्हणाले, आतापर्यंत या इमारतीच्या देखभाल, दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आलेला आहे. त्या खर्चात किमान तीन रुग्णालयांची उभारणी करता आली असती, असे त्यांनी निदर्शनास आणले. यावर्षीही 13 कोटींचा निधी देखभाल, दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी ही वास्तू आहे तो परिसर इको झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. नवीन इमारत बांधल्यास परिसरातील दोन मैदानांना धोका निर्माण होणार आहे. शिवाय या परिसरातच बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. त्यांनाही अडचण निर्माण होणार आहे. यासाठी सरकारने कृषी विभागाच्या जागेत हे रुग्णालय उभारले तर चांगली इमारत उभी राहिल आणि रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरवर्षी आपण हा मुद्दा अधिवेशानात उपस्थित करत असतो, पण सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याबद्दलही त्यानी नाराजी व्यक्त केली. यापूर्वीही तत्कालीन बांधकाम मंत्री अजित पवार, छगन भुजबळ यांच्या काळातही हा मुद्दा उपस्थित झाला होता. पण त्याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे त्यानी निदर्शनास आणले.

मी पक्ष सोडला नाही
याच चर्चेच्या दरम्यान काही सदस्यांनी भाई, तुम्हीही राज्यकर्त्यांचे मित्रपक्ष होता असा मुद्दा उपस्थित केला असता त्याला जयंत पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले. मी कोणत्याही सरकारमध्ये मित्रपक्ष म्हणून राहिलेलो नाही, हे रेकॉर्ड तपासा असे निक्षून सांगितले. मी कधी पक्ष सोडला नाही आणि जागाही सोडली नाही, असा टोलाही त्यांनी राज्यकर्त्यांना लगावला. आमच्यासारखे वेडे लोक या सभागृहात आहेत म्हणून जनता मोठ्या अपेक्षेने आमच्याकडे बघत असते. सभापतीपदासाठी मला अजितदादांनी अनेकदा ऑफर दिली. पण मी त्यांची ऑफर नेहमीच नाकारत आलो. हा स्वाभीमान आम्ही जपला असल्याचेही त्यांनी बजावून सांगितले. यावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशन संपेपर्यंत याबाबत बैठक घेऊन सरकारने तोडगा काढावा, असे निर्देश सरकारला दिले.

Exit mobile version