अलिबागच्या वकिलांची दमदार कामगिरी

| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील मुमताज गार्डन क्रिकेट मैदानावर पत्रकार भारत गोरेगावकर यांच्या पुढाकाराने व ओम फाऊंडेशनच्यावतीने प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रायगड-अलिबाग बार असोसिएशन वकिलांच्या संघाने दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी रायगड पोलीस संघावर 20 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

या स्पर्धेत रायगड पोलीस व रायगड अलिबाग बार असोसिएशन वकिल यांच्यात रविवारी (दि.29) अंतिम सामना खेळवला गेला. यावेळी प्रदर्शनीय सामन्यात पोलिसांनी नाणेफेकीचा कौल जिंकत वकिलांच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. 5 षटकांच्या या सामन्यात वकिलांच्या संघाने धुंवाधार फलंदाजी करत 4 गडी गमावत 73 धावा काढल्या. त्यामध्ये ॲड. मनीष पाटील यांनी 14 चेंडूचा सामना करतांना 54 धावा काढून वकिलांच्या संघाला मजबूत स्थितीत आणले. प्रतिउत्तर देताना पोलिसांच्या संघाने 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 53 धावा केल्या. यावेळी वकिलांच्या संघाकडून माणगावचे सरकारी वकील ॲड. प्रशांत गावंड, ॲड. मनीष पाटील, ॲड.हर्षल पाटील, ॲड. विश्वेष पिकले, ॲड. समीर बंगाली यांनी चांगली गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. तसेच, या सामन्याचा सामनावीर म्हणून अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या ॲड. मनीष पाटील यांना गौरविण्यात आले. माणगाव पोलीस स्टेशनचे पी.आय निवृत्ती बोराडे, एपीआय श्रीकांत चिरवले, प्रफुल्ल पवार, भारत गोरेगावकर व खेळाडू ऋषिकेश साखळकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व चषक देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version