आशियास्तरीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये निवड
। अलिबाग । प्रतिनिधी ।
पाचवी सोके कप ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा पनवेल तालुक्यातील तारा येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत अलिबाग व मुरूडच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रचे नेतृत्व करीत सुवर्ण कामगिरी बजावत सतरा पदके पटकावली आहेत. केरळ मध्ये होणार्या आंतरराष्ट्रीय आशियास्तरीय कराटे चॅम्पियनशिप या स्पर्धेसाठी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
ही स्पर्धा गोशिन रियू कराटे-डो असोसिएशन इंडिया व सिहान राजू कोहली यांच्या तर्फे राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, दमण, गुजरात, मध्य प्रदेश, इत्यादी राज्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी 5 ते 18 वर्षे वयोगटातील 200हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. काता व कुमिते अशा दोन प्रकारात ही स्पर्धा झाली.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग व मुरुड तालुक्यातून विद्यार्थ्यांनी 3 सुवर्ण, 6 रौप्य व 8 कांस्य अशी एकूण 17 पदके मिळविली आहेत. त्रिशूल घरत, चरण हरे, मेधांश पाटील, आराध्य पाटील, अर्चित वैद्य, दूर्वा नाईक, आर्यन वाघमारे, रेयांश नाईक, अर्णव गिरी, दुर्वेश धांडूरे, अर्चित नांगरे या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. इंडियन ओकिनावा शोरीन रियू क्युडोकान कराटे-डो इंडिया या संस्थेअंतर्गत विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.