| उरण | वार्ताहर |
आतापर्यंत जेएनपीए बंदरातील कंटेनर हाताळणीने उच्चांक गाठला असून, 35 वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच 70 लक्ष कंटेनर हाताळणी केली आहे. हा बंदरासाठी गौरवास्पद क्षण असल्याचे जेएनपीएकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
गेल्या 35 वर्षात जेएनपीएने कार्यक्षमतेच्या निकषांमध्ये सुधारणा करीत सातत्याने स्वत:ला विकसित केले आहे. यामध्ये परिसरात उच्चस्तराचे शिक्षण, निसर्ग संवर्धन, नागरी सुविधा तसेच कामगिरीमध्ये व जहाजांच्या ड्वेल टाइममध्येही सुधारणा केली आहे. विविध विस्तार योजनांमुळे 1989 मध्ये एक लाख कंटेनर हाताळणी करणारे बंदर आज 70 लक्ष कंटेनर मालाची हाताळणी करणारे देशातील एकमेव बंदर ठरले आहे. आधुनिकीकरण आणि कामगिरीच्या जोरावर देशातील पहिल्या क्रमांकाचे युवा पोर्ट म्हणून गणले जात आहे. तर जागतिक स्तरावरही 26 व्या क्रमांकावर पोहोचून जेएनपीएने वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
जेएनपीएमध्ये अनेक नवीन उपक्रम, प्रकल्प आहेत. जे देशात प्रथमच सुरू करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक न्हावा-शेवा आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी) आहे. जुलै 1997 मध्ये सुरू झालेले हे टर्मिनल देशातील बंदर क्षेत्रात सार्वजनिक व खासगी भागीदारीतून (पीपीपी) सुरू झालेले पहिलेच कंटेनर टर्मिनल आहे. ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्वावर हे टर्मिनल अद्यापही सुरू आहे. येत्या काही महिन्यात आणखी काही मोठे प्रकल्प व महत्वाचे उपक्रम कार्यान्वित होतील. या सर्व उपक्रमांमुळे जेएनपीए पुढील दशकात परिवर्तनाच्या पुढच्या टप्प्यात पोहचणार आहे.