बाराशे सीसीटीव्ही कॅमेर्यांचे जाळे: 15 प्रशिक्षित कर्मचार्यांची नियुक्ती
। ठाणे । प्रतिनिधी ।
आता ठाणे ग्रामीणच्या गुन्हेगारीवर नजर ठेवली जाणार आहे. 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गर्दीची ठिकाणे, धार्मिक स्थळे, शाळा आणि सरकारी आस्थापना येथील बाराशे सीसीटीव्ही कॅमेरे कंट्रोल रूममध्ये जोडले आहे. त्यामुळे आता गुन्हेगारांची काही खैर नाही. महिला सुरक्षा, वाहतूककोंडी आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या कंट्रोल रूमची मदत होणार आहे.
ठाणे ग्रामीण पोलिसांनी एक सीसीटीव्ही आपल्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेल्या खासगी व शासकीय आस्थापनांची भेट घेतली. यावेळी 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 4 हजार 500 कॅमेर्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यात इंटरनेटद्वारे जोडलेल्या जवळपास बाराशे कॅमेर्यांचे पोलिसांनी थेट कंट्रोल रूममध्ये अॅक्सेस घेतले आहेत. कॅमेर्यांवर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांनी 15 प्रशिक्षित कर्मचार्यांची नियुक्ती केली असून हे कर्मचारी 24 तास कार्यरत राहणार आहेत.
सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात 10 सीसीटीव्ही स्क्रिन उभारण्यात आल्या आहेत. या स्क्रिनच्या मदतीने पोलीस हायवे, ज्वेलर्स, दुकाने, हॉटेल्स, पेट्रोल पंप, घराबाहेरील कॅमेरे, शाळा-कॉलेज, मंदिर, एसटी स्टॅण्ड अशा विविध ठिकाणी करडी नजर ठेवणार आहेत. तीन शिफ्टमध्ये गरजेनुसार प्रत्येक ठिकाणी ही नजर ठेवली जाणार आहे. भविष्यात या स्क्रिनची आणि कॅमेर्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.
– संजय दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक