। आगरदांडा । प्रतिनिधी ।
ऐन उन्हाळ्यात लिंबूचे भाव वधारल्याने लिंबू बाजारातून जवळजवळ गायब झाले आहेत. मुरूड बाजारात प्रति लिंबू 10 रुपये प्रमाणे विक्री होताना दिसत आहे. नुकतीच उन्हाळ्याला सुरुवात होत आहे.उन्हाळात लिंबू आधिक महत्वाचे फळ असून लिंबू सरबताला प्रचंड मागणी असते. परंतु, सध्या अचानक लिंबूचे भाव वाढल्याने ग्राहकांना कसे समजावे, हा प्रश्न भाजीविक्रेत्यांपुढे पडला आहे. त्यात लिंबु आकाराने देखील खुप छोटे असल्याने ग्राहकांची नाराजी पसरत आहे. स्थानिक शेतकरी देखील लिंबाचा पुरवठा करू शकत नसल्याने मुंबई किंवा पुणे कृषीमार्केटमधून येणार्या महागड्या लिंबूवर मुरूडच्या बाजार व्यापारी वर्गाची मदार आहे. काही ठिकाणी तर लिंबू 12 ते 15 रूपये प्रति नग असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे लिंबूच्या वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.