वेलशेतमध्ये रिलायन्सकडून ‘अवैध’ सुरुंग; ग्रामस्थांचा आरोप, संताप व्यक्त
| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठणे जवळील वेलशेत गावातील जाखमाता मंदिर परिसरात सुरुंग लावण्याचे कथित अवैध काम सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मंदिराच्या सुरक्षिततेसह सार्वजनिक मालमत्तेला धोका निर्माण झाल्याचा इशारा देत ग्रामस्थांनी हे काम तात्काळ बंद करण्याची मागणी केली असून, आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
रोहा तालुक्यातील वेलशेत गावची ग्रामदेवता असलेल्या जाखमाता मंदिर परिसरात सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. रिलायन्स कंपनीकडून त्यांच्या विस्तारित प्रकल्पासाठी कंत्राटी कामगारांची कॉलनी उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, या बांधकामासाठी खडकाळ भागात खोदकाम करताना अवैधरित्या सुरुंग लावले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी भेट देऊन कामगार व कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे सुरुंग लावण्याची परवानगी विचारण्यात आली असता कोणतीही लेखी परवानगी दाखविण्यात आली नाही. त्यामुळे या कामाची वैधता संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.
या कथित सुरुंगकामामुळे मंदिराला तडे जाण्याचा आणि गंभीर नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, मंदिरालगतच हे काम सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याशिवाय नागोठणेअलिबाग राज्य मार्गावरील अंबा नदीवरील पुलालाही याचा फटका बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गाव पंच कमिटीचे अध्यक्ष जयेश बावकर, उपाध्यक्ष गंगाराम पारंगे, सचिव रमेश पारंगे यांच्यासह ग्रामस्थांनी नागोठणे पोलीस ठाण्यात निवेदन देत हे काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे सध्या हे काम तात्पुरते थांबवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, मंदिरासमोरील जागा सोडण्याचे आश्वासन कंपनी प्रशासनाने यापूर्वी दिले होते. मात्र त्या आश्वासनाला हरताळ फासून त्याच जागेत बांधकामासाठी खड्डे खोदण्यात आल्याने ग्रामस्थांचा संताप अधिकच वाढला आहे. “आम्ही मेलो तरी चालेल, पण मंदिरासमोरील ही जागा सोडणार नाही. गरज पडल्यास तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या प्रकरणाच्या प्रती जिल्हाधिकारी, रोहा प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालयाला पाठवण्यात आल्या असून, आता प्रशासन आणि संबंधित कंपनी यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला.







