तस्करीपासून वन्यजीवांचे संरक्षण करण्याचे आवाहन
| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील ताकई गावाच्या हद्दीत शेतजमिनीजवळ दुर्मिळ मांडूळ जातीचा साप आढळल्याने परिसरात उत्सुकता निर्माण झाली. सोमवारी (दि.16) स्थानिक युवक सुमित आणि नयन पाटील यांनी प्रसंगावधान राखत सर्पमित्रांशी संपर्क साधला. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे या सापाला कोणतीही इजा न पोहोचवता सुरक्षितपणे पकडण्यात आले. त्यानंतर खालापूर वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याचे नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र दिनेश ओसवाल यांनी गुरुनाथ साठेलकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची पाहणी करून आवश्यक खबरदारी घेत त्यांनी पूर्ण वाढ झालेल्या मांडूळ सापाचे सुरक्षित रेस्क्यू केले. त्यानंतर या घटनेची माहिती तातडीने खालापूर वन विभागाला देण्यात आली.
मांडूळ सापाबाबत समाजात आजही अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. या सापाची मोठ्या आर्थिक किमतीत खरेदी-विक्री होते, अशा अफवा पसरवल्या जातात. अशा अफवांमुळे दुर्मिळ वन्यजीवांच्या बेकायदेशीर तस्करीला आणि गैरवापराला खतपाणी मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे या सापाचे संरक्षण करून त्याचे कायदेशीर प्रक्रियेनुसार पुनर्वसन करणे महत्त्वाचे होते. खालापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक राजेश खांडेकर, बाळू रोडे यांनी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत मांडूळ सापाला सुरक्षित वनक्षेत्रात त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. या रेस्क्यू मोहिमेत अमोल ठकेकर, सुनील पुरी, अमोल कदम, श्रीकांत जाधव यांनी सर्पमित्रांच्या तत्परतेचे कौतुक करताना वन्यजीव संरक्षणासाठी नागरिकांनीही पुढाकार घेण्याचे आवाहन केले.






