ग्रामस्थांना दूषित पाण्याचा आधार
| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा तालुक्यातील मांदाटणे ग्रामपंचायत हद्दीतील पाष्टी कुणबीवाडी आणि पाष्टी बौद्धवाडी या दोन वाड्यांसाठी एकमेव सार्वजनिक पाण्याचा स्रोत असलेली विहीर सध्या अत्यंत नादुरुस्त व धोकादायक अवस्थेत आहे. ग्रामपंचायतीकडून यापूर्वी डागडुजी करून ही विहीर वापरात ठेवण्यात आली होती. मात्र, आता अचानक विहिरीचा खालचा भाग कोसळून पाण्यात पडल्याने ग्रामस्थांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
विहिरीचा काही भाग दररोज हळूहळू कोसळत असून, त्यामुळे विहिरीतील पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ होत आहे. पर्यायी पाण्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नसल्याने दोन्ही वाड्यांतील नागरिकांना नाईलाजाने याच गढूळ पाण्याचा वापर करावा लागत आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर परिस्थितीची पाहणी पंचायत समितीचे सभापती बबनजी मनवे यांनी केली असून, ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी नवीन विहीर बांधण्याबाबत त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषदेकडे मागणीचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. मात्र, सध्याची विहिरीची परिस्थिती पाहता केवळ प्रस्ताव आणि प्रशासकीय प्रक्रियेवर अवलंबून न राहता तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहे. विहिरीचा आणखी भाग कोसळण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांच्या जीवितास आणि आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्हा परिषद व संबंधित प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाष्टी कुणबीवाडी आणि पाष्टी बौद्धवाडी येथील नागरिकांसाठी तातडीने पर्यायी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी तसेच नवीन सार्वजनिक विहिरीच्या बांधकामाला लवकरात लवकर मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी जोरदार मागणी दोन्ही वाड्यांतील ग्रामस्थांकडून होत आहे.






