कॅबमध्ये ड्रग्ज, इव्हेंटमध्ये ओव्हरडोस
| मुंबई | प्रतिनिधी |
गोरेगाव येथील नेस्को परिसरात उघडकीस आलेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. विद्यार्थ्यांनी कॅबमध्येच ड्रग्सचे सेवन करणे, एमडीसारख्या घातक पदार्थांचा वापर करणे आणि त्यातून ओव्हरडोस होऊन प्रकृती बिघडणे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक व धक्कादायक आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत.
ॲड. अमोल मातेले म्हणाले, “मुंबईसारख्या महानगरात विद्यार्थ्यांपर्यंत ड्रग्ज इतक्या सहजपणे पोहोचत असतील, तर हे सरकारचे पूर्ण अपयश आहे. कल्याण परिसरातून ड्रग्ज मागवले जातात, इव्हेंटमध्ये खुलेआम सेवन केले जाते, आणि प्रशासनाला काहीच सुगावा लागत नाही. हे अत्यंत लाजिरवाणे आहे. हे फक्त काही विद्यार्थ्यांचे प्रकरण नाही, तर यामागे मोठे ड्रग्ज रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या रॅकेटला कोणाचे संरक्षण आहे? कोणत्या राजकीय दबावाखाली हे प्रकार सुरू आहेत? याची सखोल चौकशी झालीच पाहिजे! पोलीस फक्त अटक दाखवून जबाबदारी संपली असे समजत असतील, तर ते चुकीचे आहे. 15 ते 16 विद्यार्थ्यांचा सहभाग, पुरवठादारांची साखळी हे सर्व पाहता ही केवळ हिमनगाची टोक आहे.” “राज्य सरकारने तात्काळ विशेष तपास पथक स्थापन करून संपूर्ण ड्रग्ज नेटवर्क उद्ध्वस्त करावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. महाराष्ट्रातील तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी आम्ही कुठल्याही टोकाला जाऊ!”
उच्चस्तरीय चौकशी करा
ड्रग्ज पुरवठा साखळीचा संपूर्ण भांडाफोड करावा. संबंधित पोलीस व प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावीशैक्षणिक संस्थांमध्ये अँटी-ड्रग्ज मोहीम तातडीने राबवावी, महाराष्ट्राला ड्रग्जमुक्त करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि त्यात अपयश आल्यास जनता माफ करणार नाही!






