मागणीनुसार एसटी बसेस सोडण्यास प्रशासन उदासीन
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
पर्यटकांसह प्रवाशांच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या अलिबाग व मुरूड एसटी बस आगाराचा कारभार जुन्या एसटीच्या भरवशावर चालत आहे. सीट खराब असणे, बस सतत रस्त्यात बिघडणे, गाडीतील बॅटर्या खराब असणे अशा अनेक समस्यांच्या गर्तेत अलिबाग व मुरूडची एसटी सापडली आहे. मागणीनुसार बसेस सोडण्यास प्रशासन उदासीन ठरत आहे. त्याचा नाहक त्रास प्रवाशांना कायमच होत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. अलिबागमध्ये विविध जिल्हा तालुका स्तरावर विविध सरकारी कार्यालये आहेत. तसेच अलिबागमध्ये पर्यटकांची वर्दळही प्रचंड आहे. अलिबागमधील कुलाबा किल्ला, सरखेल कान्होजी आंग्रे यांची समाधी व सुंदर असा समुद्रकिनारा पाहण्यासाठी पर्यटकांची अधिक पसंती राहिली आहे. तसेच मुरूड तालुकादेखील पर्यटन व ऐतिहासिक क्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे.
अलिबाग व मुरूडमध्ये नोकरी व्यवसायासाठी येणार्यांची संख्यादेखील प्रचंड आहेत. त्या पर्यटकदेखील मोठ्या प्रमाणात येतात. स्थानिकांसह लाखो पर्यटक या तालुक्यांना नागरिक आवर्जून भेटी देतात. प्रवाशांची वर्दळ असलेल्या या दोन्ही तालुक्यातील आगारातील अवस्था बिकट आहे. अन्य आगारात नव्या गाड्या पाठविल्या जात आहेत. परंतु अलिबाग व मुरूड आगाराला गाड्या देण्यास डावळले जात असल्याचा आरोप एसटी प्रेमींकडून केला जात आहे. पोयनाड-नागोठणे मार्गावरील प्रवाशांना एसटी बससाठी तासनतास वाट पाहवी लागत आहे. गेल्या 28 वर्षापासून चालू असलेली सांबरी-परळ, आग्राव-बोरीवली फेरी चालक, वाहक नसल्याचे कारण दाखवून बंद करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून मुंबईसारख्या मोठ्या शहराला जोडणार्या गाड्या बंद केल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
शिर्डीसह वेगवेगळी धार्मिक व पर्यटन स्थळांना भेटी देणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात आहे. जिल्हे, तिर्थक्षेत्र, पर्यटन क्षेत्रांना जोडणार्या अलिबाग-शेगाव, अलिबाग- तुळजापूर, अलिबाग-अंबेजोगाई, अलिबाग-गाणगापूर, अलिबाग-लातूर, अलिबाग-जळगांव, अलिबाग-त्रंबकेश्वर, अलिबाग-शिर्डी (रातराणी), अलिबाग-सावंतवाडी, अलिबाग-सुरत, अलिबाग-महाबळेवर एसटी बसेस सुरु करण्याची मागणी वारंवार एसटी महामंडळाकडे करण्यात आली आहे. विभाग नियंत्रकांपासून आगार व्यवस्थापकांकडे एसटीप्रेमींना केले आहे. तरीदेखील या बसेस सुरु करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोपही केला जात आहे.
अलिबाग-मुरूड हे पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ आहे.अलिबाग व मुरूड आगारात जुन्या गाड्या आहेत. त्याचा नाहक त्रास प्रवाशांना व पर्यटकांना होत आहे. त्यामुळे अलिबाग व मुरूडमधील पर्यटनावर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पोयनाड-नागोठणे मार्गावर प्रवासी असतानादेखील या मार्गावर ज्यादा गाड्या पाठविण्यास प्रशासन उदासीन ठरले आहे.
– एसटीप्रेमी, रायगड
सर्वच आगारात सुस्थितीत एसटी बसेस आहेत. लांब पल्ल्यांच्या गाड्या पाठविताना लोकल ठिकाणीदेखील गाड्या पाठविणे गरजेचे आहे. गर्दीचा हंगाचा विचार करून सुट्टीच्या दिवशी लांब पल्ल्याच्या गाड्या पाठविल्या जातात.
– दिपक घोडे, विभाग नियंत्रक,
एसटी महामंडळ, रायगड विभाग