चित्रलेखा पाटील यांच्याकडून सदिच्छा भेट; गोरेगाव संघ विजेता
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील पत्रकारांसाठी पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धा रविवारी (दि.1) आयोजित करण्यात आली होती. अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धेत गोरेगाव प्रेस क्लबने विजेतेपद पटकावले. अलिबागचा संघ उपविजेता ठरला. महाड प्रेस असोसिएशनने तृतीय तर पेण प्रेस क्लबने चतुर्थ क्रमांक मिळवला. या संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे यजमानपद अलिबाग प्रेस असोसिएशनने स्विकारले होते.
अलिबागमधील नेहूली येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या भव्य अशा मैदानात पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात करण्यात आले. अलिबागचे माजी नगराध्यक्ष तथा वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, आरसीएफचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी संतोष वझे, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी , रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी स्पर्धेच्या ठिकाणी सदिच्छा भेट दिली.
क्रीडा प्रेमींना ही स्पर्धा घरबसल्या बघता यावी, यासाठी सोशल मिडीयाची व्यवस्था करण्यात आली. अलिबागसह पेण, पनवेल, माणगाव, महाड, अशा अनेक तालुक्यातील संघ या स्पर्धेत सहभागी झाला होता. या स्पर्धेतील अंतिम सामना गोरेगाव व अलिबाग संघामध्ये झाला. सुरुवातीला गोरेगाव संघाने फलंदाजी केली. चार षटकामध्ये या संघाने 66 धावा केल्या. अलिबाग संघासमोर 67 धावांचे आव्हान होते.मात्र गोरेगाव संघाने चार षटकात अलिबाग संघाला 22 धावा दिल्या. त्यामुळे गोरेगाव संघ अंतिम विजेता ठरला.तर अलिबाग संघ उपविजेता ठरला. गोरेगाव संघातील आदिनाथ गोविलकर हे स्पर्धेचे मानकरी ठरला. अलिबाग संघातील प्रदीप ठाकूर यांना उत्कृष्ट गोलंदाज तर पेण संघाचे नित्यानंद पाटील यांना उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरविण्यात आले. सहयोग पतसंस्थेचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा पतसंस्थांचा महासंघाचे सेक्रेटरी योगेश मगर, सनदी लेखापाल संजय राऊत, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अलिबाग प्रेस असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य यांनी प्रचंड मेहनत घेतली.
