| अलिबाग | प्रतिनिधी |
जीर्ण झालेली इमारत, परिसरात घाणीचे साम्राज्य, डॉक्टरांचा तुटवडा अशा अनेक समस्या जिल्हा रुग्णालयाच्या असताना आता येथे उंदराचा वावर वाढल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील पुरुषांच्या जनरल वार्डमध्ये संध्याकाळनंतर उंदीर फिरत असतात. रात्रीच्यावेळी निद्रावस्थेत असताना बॅग कुरतडणे व अन्य पदार्थ चोरण्याचा प्रयत्न करीत आहेत. उंदराचा वाढता उपद्रव तेथील परिचारिकांसह रुग्णांनादेखील डोकेदुखी बनत आहे.
250 खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्य रुग्ण कक्ष आहे. या कक्षामध्ये रुग्णांमध्ये नियमीत तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले जात आहे. तसेच बाजूच्या जुन्या इमारतीमध्ये तळमजल्यावर अपघात व डायलेसीस विभाग असून पहिल्या मजल्यावर प्रसुती कक्ष अन्य आजारावरील उपचाराचे कक्ष आहे. दुसऱ्या मजल्यावर महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र वार्ड आहेत. यातील पुरुषांच्या जनरल वार्डमध्ये अनेक दिवसांपासून उंदराचा वावर वाढला आहे.
उंदीर संध्याकाळी ऑनड्युटी दिवसभर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ असल्याने उंदीर दिसून येत नाही. मात्र संध्याकाळी साडे सात ते रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वर्दळ कमी झाल्यावर हळूहळू उंदीर या वार्डमध्ये ठिकठिकाणी फिरत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या इमारतीच्या बाजूलाच लागून असलेल्या परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. या घाणीमुळे उंदीराचा उपद्रव वाढत आहे. रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी ठिकठिकाणी केलेली खोदाई, पाडलेले खड्डे याचा अधार घेत उंदीर या वार्डमध्ये शिरत असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत एका परिचारिकेला विचारणा केली असता, रात्री साडेआठ नंतर गर्दी कमी झाल्यावर उंदीर येतात. रुग्णांसाठी आणलेल्या खाऊवर व ठेवलेल्या पिशवी, बॅग कुरतडण्याचे काम हे करीत आहेत. या उंदराचा उपद्रव वाढत असताना, त्यावर उपाय करण्यास रुग्ण प्रशासन उदासीन ठरत असल्याने रुग्णालयातील रुग्णांसह कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येऊ लागले आहे.
नो पार्कींगचा विळखा अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णांची नेहमी वर्दळ असते. दिवसाला 800 हून अधिक नागरिकांची रुग्णालयात होते. मात्र रुग्णालयाच्या आवारात आता नो पार्कींगचा विळखा घातला आहे. रुग्णालयात जाण्याच्या मार्गावरच ठिकठिकाणीनो पार्कींगचे बोर्ड लावले आहेत. त्यामुळे वाहने कुठे पार्कींग करायची असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यात नो पार्कींगच्या जागी दुचाकी वाहन चालकांना तेथील सुरक्षा रक्षक रोखतात, पण चार चाकी वाहन आल्यावर त्यांना रोखण्यास टाळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरक्षा रक्षकांचा हा दुजाभाव सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी बनत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.