वृद्ध जागीच ठार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी
अलिबाग-रेवस मार्गावर भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका वृद्ध दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातानंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, अलिबाग-रेवस मार्गावरील वाढती डंपर वाहतूक आणि बेदरकार वाहनचालकांबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हायवा डंपर रेवसकडून उसरच्या दिशेने जात होता. सोमवारी (दि.18) सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास भालनाका परिसरात पुढे जाणाऱ्या स्कूटरला डंपरची जोरदार धडक बसली. या भीषण धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी जखमी वृद्धाला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत व्यक्तीचे नाव संदीप पाटील (61) रा. तुडाळ, ता. अलिबाग असे असून, ते मासळी आणण्यासाठी दुचाकीवरून अलिबागकडे जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर अलिबाग-रेवस मार्गावरील वाढत्या डंपर वाहतुकीबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. माती, खडी आणि भराव वाहतुकीसाठी या मार्गावर मोठ्या प्रमाणात डंपरची वर्दळ वाढली असून, चालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. घोटवडे परिसरातील अजित ठाकूर यांच्या मालकीचा हा डंपर असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. मात्र, अधिकृतरित्या पोलिसांकडून याबाबत दुजोरा देण्यात आलेला नाही. या भीषण अपघातामुळे अलिबाग-रेवस मार्गावरील अन्य वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, बेदरकार डंपर चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
