। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यात एका भरधाव वेगात असलेल्या डंपर चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक तिथून पळून गेला.
हा अपघात पुण्यामधील मुळशी तालुक्यातील भूकंप परिसरामध्ये रात्री घडला. बुधवारी (दि. 11) रात्री गणपती दर्शन घेऊन अनिल काळू सूर्यवंशी आणि प्रिया अनिल सूर्यवंशी हे दोघे आपल्या दुचाकीवरून भूगाववरून भुकूमकडे चालले होते. त्याचवेळी वेगाने जाणाऱ्या डंपर चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. मात्र, डंपरचालकाने घटनास्थळी न थांबता तिथून पळ काढला. त्यामुळे या पती-पत्नींना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणी डंपरचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.