| मुंबई | प्रतिनिधी |
एका रेल्वे कर्मचाऱ्याने ट्रेनमध्येच अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. घटनेमुळे संतापलेल्या इतर प्रवाशांनी त्या रेल्वे कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. या घटनेत संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बरौनीहून नवी दिल्लीला जाणाऱ्या हमसफर एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बरौनीहून नवी दिल्लीला जाणाऱ्या हमसफर एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये रेल्वे कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. लखनौ ते कानपूरपर्यंत प्रवासी त्याला मारहाण करत होते, या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कानपूर सेंट्रल येथील जीआरपीने या रेल्वे कर्मचाऱ्याला रुग्णालयात नेले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पीडित मुलीच्या आईने आरोपीविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. तर रेल्वे कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी देखील हत्येची लेखी तक्रार पोलिसांकडे दिली आहे. प्रशांत कुमार, असें मृत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.11) रोजी सिवानमधील एक कुटुंब समस्तीपूर-नवी दिल्लीदरम्यान धावणाऱ्या हमसफर एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. त्यांच्यासोबत त्यांची 11 वर्षांची मुलगी देखील होती. रात्री मुलीची आई शौचालयात गेली असता या रेल्वे कर्मचाऱ्याने मुलीचा विनयभंग केला. आरोपीने तिला धमकावले देखील होते. जेव्हा तिची आई शौचालयातून परत आली तेव्हा पीडित मुलीने घडलेला प्रकार सांगितला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी घटनेची माहिती कोचमधील इतर प्रवाशांना दिली. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्याला धारेवर धरले. मुलीची छेड काढल्यामुळे संतप्त लोकांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. प्रवाशांनी आरोपीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पीडितेच्या कुटुंबीयांनी या घटनेची माहिती रेल्वे कंट्रोलला दिली होती. बुधवारी पहाटे 4.35 वाजता ट्रेन कानपूर सेंट्रलच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर येताच पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला जीआरपीने उपचारासाठी केपीएममध्ये पाठवले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही माहिती मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आली. ही माहिती मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आली. मृतांच्या नातेवाईकांनी खुनाचा आरोप केला आहे.