| माणगाव | वार्ताहर |
तीन तरुणांमध्ये झालेल्या वादात एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रायगडमध्ये घडली आहे. माणगाव रेल्वे स्थानकानजिक घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून याप्रकरणी दोन अनोळखी आरोपींविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवारी (दि.11) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास माणगाव रेल्वे स्थानकानजिक दुकानाच्या शेडमध्ये तीन तरुणांमध्ये वाद झाला त्यानंतर ही मारामारीची घटना घडली. या परिसरात गुरुवारी सकाळी अंगावर हत्याराच्या जखमा असलेला मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करत असताना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. यामध्ये भांडण आणि मारामारीची घटना कैद झाली होती. ज्यावरुन या प्रकरणाचा खुलासा झाला. धक्कादायकबाब म्हणजे गंभीर जखमी व्यक्तीला उपचार देण्याऐवजी तशाच जखमी अवस्थेत सोडून दोन्ही आरोपी फरार झाले. वेळेत उपचार न मिळाल्यानेच या तरुणाचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेले चाकूसारखे हत्यार, रक्त पुसून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. रायगड जिल्ह्यात तिहेरी हत्याकांडाची घटना ताजी असताना आणखी एक हत्येची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.