जागा वाटपात दगाफटका झाल्यास पाडापाडीचे राजकारण
| रायगड | आविष्कार देसाई |
राज्यात विधानसभा निवडणूकांचे बिगुल आता काहीच दिवसात वाजण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचे सूत्र अद्याप ठरलेले नाही. अशातच आता महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असणार्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभेवर आपला हक्क राखून ठेवला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जशास तसे उत्तर देण्याची तयारी केल्याने शिंदे गट विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात वितृष्ठ निर्माण झाल्याचे चित्र आहे.
जागा वाटपात काही दगाफटका झाला तर महायुतीमधील तणाव विकोपाला जाऊन पाडापाडीचे राजकरण होण्याची शक्यता नाकरता येणार नाही. तुतार्स खासदार तटकरे यांनी आपल्या वक्तव्याने कर्जत मतदार संघात महायुतीमध्येच खळबख उडवून दिल्याचे दिसून येते. काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत कर्जतची जागा लढण्याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. तसेच या विधानसभा मतदार संघातून त्यांच्याच पक्षाचे सुधाकर घारे यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मतदार संघात आपणच विकास कामे करत असल्याचा दावा ते सातत्याने करत असून त्यामाध्यमातून ते विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना आव्हान देत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. याला थोरवे यांनी उत्तर देताना काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमीपुजन तसेच काही विकास कामांची मुहूर्तमेढ त्यांच्या हस्ते रोवण्यात आली होती. आमदार थोरवे हे कडवट शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. ते नेहमीच आपल्या बिनधास्त स्वभाव आणि वक्यव्यासाठी प्रसिध्द आहेत. एखादी गोष्ट करायची ठरवली की ते तडीस नेतातच असा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे. वरीष्ठ नेतेच महायुतीमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहेत, असा सूर सध्या राजकीय वर्तुळात उमटत आहे.
मुळात सुरुवातीला या मतदार संघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशीच सरळ लढत होत असे. माजी आमदार सुरेश लाड यांनी बराच काळ या मतदार संघावर वर्चस्व निर्माण केले होते. पुढे त्यांचे आणि तटकरे यांच्यामध्ये काही कारणांवरुन फाटल्याने त्यांनी पक्षाला रामाराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला होता. सध्या या मतदार संघावर भाजपाचा ही डोळा असल्याची चर्चा आहे. मात्र, जागा वाटपात कोणाला किती आणि कोणत्या जागा मिळणार यावर राजकीय गणित अवलंबून असणार आहे.