अनधिकृत कंटेनर यार्डवर कारवाई करण्यास प्रशासनाचा चालढकलपणा
| उरण | वार्ताहर |
महसूल विभागाच्या काही वसुली अधिकार्यांमुळे वसलेल्या अनधिकृत कंटेनर यार्डच्या बाहेर उभे राहणारे ट्रेलर्स, मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी खराब झालेला रस्ता आणि रस्त्यात बंद पडलेले ट्रेलर्स या कारणामुळे सध्या पनवेल गव्हाण फाटा ते दिघोडे या रस्त्यात वाहतूक कोंडी नित्यनेमाने होत आहे. राजकीय नेत्यांची येथे अनधिकृत कंटेनर यार्ड आहेत. त्यांचे अधिकारी वर्गाबरोबर आर्थिक साटेलोटे असल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा आहे.
याबाबत तहसीलदारांना उरण तालुका मराठी पत्रकार संघाने असे अनधिकृत कंटेनर यार्ड कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली होती. परंतु तहसीलदार उद्धव कदम यांनी पत्रकार संघाची बैठक घेऊन लवकरच कारवाई करू, असे आश्वासन दिले होते. याला महिना उलटूनही याबाबत प्रशासन ठोस निर्णय घेण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. याबाबत लवकरच उरण तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहे. उरण तालुक्यातील अनधिकृत कंटेनर यार्डवर कारवाई करण्यात यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.
रोज याठिकाणी वाहतूक कोंडी होत असून हे साडेसहा किमी अंतर जायला अर्धा ते एक तास एवढा वेळ लागतो. त्यामध्ये वेळेचा अपव्यय व पेट्रोल, डिझेलही वाया जाते. प्रवाशांना नियोजित ठिकाणी जायला आधिक वेळ लागतो. गेल्या काही महिन्यात या वाहतूक कोंडी मुळे काही अपघात देखील झाले आहेत. ट्रेलर्सची अनधिकृत पार्किंग हेच वाहतूक कोंडीचे मुख्य कारण बोलले जात आहे. औद्योगिकि करणाच्या नावावर उरणचे मरण मात्र स्वस्त झाले आहे. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे. कारण भविष्यात या वाहतूक कोंडीमुळे जर एखादा मोठा अपघात घडला तर येथील जनता त्यांना माफ करणार नाही. उलट संबंधित अधिकारी वर्गांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे.