| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील नेरळ गावातील पाडा येथे एका कार चालकाला रबराचे दांडक्याने मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेनंतर सर्वत्र खळबख उडाली होती. मारहाण करणार्या तरुणाच्या मुसक्या पोलीसांनी कल्याण येथे आवळल्या आहेत.
नेरळ गावातील पाडा भागातील राजबाग सोसायटीच्या गेट समोर( 7 सप्टेंबर रोजी) सायंकाळी एका कारमधील चालकाला एक तरुण मारहाण करीत होता. त्याबाबतचा व्हिडीओ 11 सप्टेंबर रोजी व्हायरल झाला होता. संबंधित व्हिडिओची सत्यता तपासून घेत या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा शोध घेण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दिले होते. अमोल अरुण बांदल असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
त्यानंतर नेरळ पोलिसांनी संबंधित तरुणाचा शोध घेतला. मारहाण झालेला तरुण वडखळ येथील जे एस डब्लू रुग्णालयात उपचार घेत होता. अमोलने नेरळ पोलीस ठाण्यात सायंकाळी साडेसात वाजता तक्रार दाखल केली. त्या व्हायरल व्हिडीओमधील जखमी अमोल हा कर्जत बोरवाडी येथील रहिवाशी आहे. त्यानंतर नेरळ पोलिसांच्या पथकाने कल्याण येथून शिवाजी गोविंद सोनावळे तथा शिवा यास ताब्यात घेवुन नेरळ येथे आणले. विशेष म्हणजे अमोल आणि शिवाजी हे दोघे मित्र असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, शिवाजी सोनावळे हा पिंपलोली गावातील रहिवाशी असून 35 वर्षीय शिवाजी उर्फ शिवा हा 2022 मध्ये झालेल्या कर्जत येथील घटनेतील आरोपी होता. माथेरान शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद सावंत यांची गाडी फोडून मारहाण करण्याच्या हल्ल्यातील शिवा हा दुसरा मुख्य आरोपी होता.