अलिबाग – रोहा रस्ता खड्डयातच

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

स्वखर्चाने अलिबाग – रोहा मार्गावरील रस्ता तयार करून देण्याची बतावणी आमदार दळवी यांनी केली होती. परंतु, प्रवाशांसह नागरिकांची घोर निराशा दळवींनी केली आहे. अलिबाग- रोहा मार्गावरील रस्ता खड्डयातच असल्याचे चित्र आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. खड्डे चुकविताना वाहनांचा अपघात होत आहे. आमदारांनी दिलेला शब्द पाळला नसल्याने नागरिकांसह प्रवाशी वर्गाकडून संतापाची लाट उसळली आहे.

अलिबागपासून रोहा साईपर्यंत 84 किलो मीटरच्या रस्त्यासाठी सुमारे 170 कोटी रुपयांचा निधी शेकापच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला होता. 2019 मध्ये विधानसभा निवडणूकीपूर्वी अलिबाग रोहा रस्ता स्वखर्चाने करून देईल असे आश्वासन दळवी यांनी दिले होते. नागरिकांनी विश्वासाने रस्त्यासाठी त्यांना निवडून दिले. त्यानंतर अनेक वेळा बेलकडे फाट्यावर नारळ वाढविण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष कामाला काही मुहूर्त लागला नाही. भाजप आणि शिंदे गटात श्रेयवाद झाल्यावर अखेर गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. खानाव ते धसाडे कुणे पर्यंतचा रस्ता काँक्रीट करण्यात आला. मात्र, खानावपासून वेलवली खानाव, धसाडे कुणे ते उसर, वावे, सुडकोली, या परिसरातील रस्त्यावर खड्ड्‌‍यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून रस्त्यावरील खडी उखडली असल्याने दुचाकी वाहने घसरून अपघात होत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.

विद्यमान आमदारांनी अनेक वेळा या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन केले. परंतु, पाच वर्षात हा रस्ता पुर्ण करण्यास अपयशी ठरल्याचे चित्र आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे अलिबाग सुडकोली मार्गावरील प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. अनेक वेळा एसटी बसेसदेखील या रस्त्यावर बिघडत आहेत. आमदारांनी दाखविलेले स्वप्न ते स्वप्नच राहिल्याची प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहे. या रस्त्याचे 50 टक्केहून अधिक काम झाल्याचा दावा बांधकाम विभागाकडून केला जात आहे. गणेशोत्सवासह नवरात्रौत्सवदेखील खड्डयातून साजरा करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. अलिबाग – रोहा मार्गावर खड्डेच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे संतापाची लाट निर्माण झाली आहे. खड्डयांमुळे कंबर दुखीचे आजार वाढले आहेत. वाहनांची दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. मात्र, खड्डे दुरुस्त करण्यास बांधकाम विभाग आजही उदासीन ठरत आहे.

अलिबाग – रोहा मार्गावरील रस्त्यांचे काम वेळेवर होत नसल्याबाबत जेआरए कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे.

मोनिका धायतडक
कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग

Exit mobile version