वाहनचालकांमध्ये प्रचंड मनस्ताप
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील बोरघर ते रामराज हा दोन किलो मीटरचा रस्ता पुर्णतः खड्डयात गेला आहे. अनेक भागांमध्ये मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तरीदेखील या रस्त्याची दुरुस्ती करण्यास रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग उदासीन ठरत आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या उदासीनतेमुळे या रस्त्यावरील वाहतूक खड्ड्यांमुळे बंद होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर असताना, रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या बोरघर फाटा ते रामराज पर्यंतच्या खराब रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागला आहे. रायगड जिल्हा परिषदेवर गेल्या वर्षभरापासून प्रशासकिय राज असूनदेखील या रस्त्याची दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने नाराजीचे सुर उमटत आहेत.
बोरघर फाटा ते रामराज या मार्गावरील रामराज हे मुख्य स्थानक असून रामराजला मोठी बाजारपेठ आहे.दर आठवड्याला शनिवारी आठवडा बाजार भरतो. या दिवशी भाजीपालासह, किराणा सामान, ओली, सुकी मासळी व अन्य खाद्य पदार्थ वस्तू कपडे खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी होते. रोहा तालुक्यातील सानेगाव, दापोली अलिबाग तालुक्यातील कुदे, सुडकोली, नांगरवाडी, ताजपूर, नवघर, उमटे, बेलोशी, महाजने, वावे, मल्याण, चिंचोटी, दिवीपारंगी, फणसापूर, बापळे भोनंग आदी गावांतील हजारो ग्राहक रामराजमध्ये खरेदीसाठी येतात. रामराज हे वर्दळीचे ठिकाण असल्याने बोरघरफाटा ते रामराज या मार्गावरून दुचाकी वाहनांसह तीन चाकी, चारचाकी वाहने व एसटी बसची ये-जा सतत असते. रामराज हे मुख्य ठिकाण असल्याने एसटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. अलिबाग व रोहा एसटी बस आगारातून अलिबाग-रामराज-रोहा, अलिबाग-रामराज, रोहा-रामराज मार्गे अलिबाग अशा अनेक बसेस या मार्गावरून सुरु केल्या आहेत. अलिबाग-रोहा मार्गावरून रामराजकडे जाण्यासाठी बोरघरफाट्यावरून दोन किलो मीटर जावे लागते. गेल्या गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यांची दुरुस्ती करण्यास जिल्हा परिषद बांधकाम विभाग उदासीन ठरले आहे. बोरघरफाटा ते रामराज मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या रस्त्याला तळ्याचे स्वरुप आले आहे. या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा अपघातही या खड्ड्यांमुळे झाला असल्याची प्रतिक्रीया स्थानिकांकडून उमटू लागली आहे.
बोरघर फाटा ते रामराज रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनांध्ये बिघाड होण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्याचा खासगी वाहन चालकांसह सरकारी एसटी महामंडळालादेखील बसत आहे. या खड्ड्यांमुळे वाहन चालविणे कठीण होऊ बसले आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे एसटी बसची वाहतूक बंद होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या रस्त्याकडे तातडीने लक्ष द्यावे. एसटी बस सेवा बंद झाल्यास येथील प्रवाशांना दोन किलो मीटर पायपीट करावी लागणार आहे. त्याचा फटका अलिबाग, रोहा कडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रवाशांना बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
बोरघर फाटा ते रामराज हा रस्ता माजी आमदार पंडित पाटील यांच्या माध्यमातून दहा वर्षापुर्वी झाला होता. आता या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. शिंदे गटातील मानसी दळवी यांनी मोठा गाजावाजा करीत या रस्त्यावर नारळ फोडीचे काम केले. पण प्रत्यक्षात मात्र आजही येथील प्रवासी खड्ड्यातून प्रवास करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. काही शेकापचे कार्यकर्ते हा रस्ता होईल यासाठी शिंदे गटात सामील झाले. पण त्यांचीही घोर निराशा झाल्याची चर्चा आहे.
सुभाष वागळे, सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती