अलिबागचे नामकरण मायनाक नगरी करावे

विधानसभा अध्यक्ष यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

| मुंबई | प्रतिनिधी |

अलिबाग शहरासह तालुक्याचे मायनाक नगरी असे नामकरण करण्यात यावे तसेच मायनाक भंडारी यांचे अलिबाग शहरात भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशा आशयाचे पत्र विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत सागरी संरक्षण आणि सागरी मोहिमांना अतिशय महत्त्व आहे. महाराजांनी दूरदृष्टीने बलाढ्य आरमाराची उभारणी केली. कोकणातील भंडारी समाजाचे नेतृत्व करणारे मायनाक भंडारी या शूर लढवय्याकडे त्यांनी समुद्रमार्गे स्वराज्याला धोका उद्भवल्यास सागरी सीमेचे संरक्षण करण्याची जबाबदारी सोपवली होती. अलिबाग येथील खांदेरी-उंदेरी बंदरावरील किल्ला आणि तेथील मायनाक भंडारी यांचा पराक्रम, चिवट संघर्ष यापुढे इंग्रजांनादेखील माघार घ्यावी लागली होती. स्वराज्याचे आरमार आणि त्यासंदर्भातील इतिहास यातील मायनाक भंडारी यांच्या या पराक्रमाचा ऐतिहासिक संदर्भ घेता हे नामकरण करावे, असेही नार्वेकर यांनी म्हटले आहे.

अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर, मुख्य सचिव प्रकाश कांबळी, सहसचिव वैभव तारी आणि प्रवक्ते शशांक पाटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन अलिबाग शहरासह तालुक्याचे मायनाक नगरी असे नामकरण करण्यात यावे तसेच मायनाक भंडारी यांचे अलिबाग शहरात भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी केली आहे. याबाबतचे निवेदनदेखील या शिष्टमंडळाने नार्वेकर यांना सादर केले.

सदरची मागणी अतिशय रास्त असून, त्याची शासन स्तरावरून उचित दखल घेण्यात यावी आणि नामकरण, स्मारक उभारणी याद्वारे या मागणीची पूर्तता व्हावी, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

Exit mobile version