अलिबाग क्रीडा महोत्सव; श्री गणेश दिवलांग कबड्डीचा अंतिम विजेता

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग क्रीडा महोत्सवातील कबड्डी स्पर्धेमध्ये श्री गणेश दिवलांग संघाने अंतिम विजेते पदावर आपले नाव कोरले. चिंतामणी नागाव बंदर या कब्बडी संघाची कडवी झुंज अपयशी ठरली. शिस्तबद्ध खेळ करून दोन्ही संघांनी प्रेक्षकांची जिंकली. श्री गणेश दिवलांगचा खेळाडू प्रतीक धुमाळ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. चिंतामणी नागाव बंदर संघाचा अखिल ठाकूर याने उत्कृष्ट चढाईचा बहुमान मिळविला. श्रीराम कमळपाडा संघाचा खेळाडू जितेंद्र पाटील याला उत्कृष्ट पक्कड या पुरस्काराने गौरविण्यात आले. अलिबाग क्रीडा महोत्सवातील कबड्डी स्पर्धेत शहापूर संघाचा अक्षय पाटील हा पब्लिक हिरो

युवा शेकाप आणि बी यु प्रोडक्शन आयोजित अलिबाग क्रीडा महोत्सवाची सांगता कबड्डी स्पर्धेने झाली. या कबड्डी स्पर्धेचे उदघाटन शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अपेक्षा कारेकर, अलिबाग नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, आंबेपुर ग्रामपंचायतच्या सरपंच सुमना पाटील, माजी नगरसेवक नाईक, युवा शेकाप नेते विक्रांत वार्डे, युवा शेकाप सदस्य भूमिका कोळी कारेकर, बी यु प्रोडक्शनचे उमेश कोळी, महेश कोळी, यतीराज पाटील, अजय झुंजारराव, अनिल चोपडा, मुकेश जैन, जिल्हा पोलीस वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस, मांडवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव पीएनपी शैक्षणिक संकुलाचे जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, महिला आघाडी तालुका अध्यक्ष प्रीती पाटील, पेंढामबे ग्रामपंचायत सरपंच दिग्विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

अलिबाग क्रीडा महोत्सवात होणार्‍या कबड्डी स्पर्धेसाठी 16 संघांना आमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेत झालेले सर्वच सामने अतितटीचे झाले. प्रत्येक सामन्यात झालेल्या चढाया आणि पक्कड याने उपस्थित रसिकांची मने जिंकली. सायंकाळी 8 वाजता कार्यक्रमाचे उदघाटन होण्यापूर्वी नटराज डान्स अकॅडमीच्या चिमुकल्या कलाकारांनी सादर केलेल्या नृत्य अविष्कारला उपस्थित मान्यवर पाहुण्यांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

खेळाडूना शेकापचा पाठिंबा
अलिबाग हे कबड्डीचे माहेरघर आहे. अनेक दिग्गज खेळाडू अलिबागच्या मातीने देशाला दिले आहेत. पुस्तकी ज्ञानाबरोबरच खेळाचे ज्ञान आणि जिद्द अलिबागकरांच्या रक्तात आहे. सामाजिक उपक्रमाबरोबरच क्रीडा जगतात उभारी घेणार्‍या खेळाडूंच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्ष कायम उभा राहिला आहे. अलिबाग क्रीडा महोत्सवाने अलिबाग मधील खेळाडूंचे टॅलेंट हेरून त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात या क्रीडा महोत्सवातून देशाचे नाव जागतिक पातळीवर झळकविणारे खेळाडू तयार होतील असा विश्‍वास शेकापच्या महिला प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी बोलून दाखविला.

Exit mobile version