स्वच्छतेमध्ये अलिबाग स्थानक विजेता

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानामध्ये रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पालघर या विभागातील नऊ स्थानकांची विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे. स्पर्धेमध्ये रायगड विभागातील अलिबाग एसटी बस आगार तृतीय क्रमांकाने विजेता ठरला आहे. मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी (दि.1) अलिबाग एसटी बस आगाराचे व्यवस्थापक राकेश देवरे आणि स्थानक प्रमुख अभिजीत मांढरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील प्रत्येक आगार, स्थानकांमधील सोयी सुविधा, स्वच्छता, कामकाज अशा अनेक प्रकारचे निकष या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आले होते. रत्नागिरीपासून वेगवेगळ्या जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकारी यांनी अलिबागसह जिल्ह्यातील अनेक स्थानक, आगार यांना भेट दिली. तेथील कामकाजाची व प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. त्यानंतर गुण देण्यात आले.

2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बसस्थानक अभियानांमध्ये मुंबई प्रदेशातील नऊ स्थानकांची विजेती म्हणून निवड करण्यात आली आहे. वेगवेगळ्या गटामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये मुंबई विभागातील मुंबई सेंट्रलचा (गट ब) प्रथम क्रमांक, कुर्ला नेहरु नगरचा (गट ब) द्वितीय क्रमांक, तर परळ स्थानकाने (गट क) तृतीय क्रमांक मिळवला आहे. पालघर विभागातील बोईसर स्थानकाने (गट अ) द्वितीय क्रमांक, तर, नालासोपारा स्थानकाने (गट क) तृतीय क्रमांक मिळविला आहे. रत्नागिरी विभागातील रत्नागिरी नवीन स्थानकाने (गट अ) प्रथम क्रमांक, तर माखजन स्थानकाने (गट क) द्वितीय क्रमांक मिळविला आहे. ठाणे विभागातील ठाणे खोपट स्थानकाने (गट ब) तृतीय, तसेच रायगड विभागातील अलिबाग एसटी बस स्थानकाने (गट अ) तृतीय क्रमांक मिळविला आहे. या सर्व आगारातील व्यवस्थापक, स्थानक प्रमुख यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अलिबाग एसटी बस आगाराचे व्यवस्थापक राकेश देवरे आणि स्थानक प्रमुख अभिजीत मांढरे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

Exit mobile version