महामंडळाच्या स्वच्छ सुंदर अभियानाला ब्रेक
| रायगड | प्रमोद जाधव |
सर्वसामान्यांना एसटी बस स्थानकात उभे राहताना समाधान वाटावे, एसटीतून प्रवास करताना सुरक्षीतता आणि आनंद निर्माण व्हावे, म्हणून मात्र, एसटी महामंडळाचा हा दिखावा फक्त अभियानापुरता असल्याचे समोर आले आहे. अलिबाग एसटी बस स्थानक जिल्ह्याचे ठिकाण असतानाही या स्थानकात ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून, सुविधांचा देखील अभाव आहे. अशा अनेक समस्या असताना अलिबाग स्थानकात कचऱ्याचा ढिगारा दिसून आला आहे. त्यामुळे अलिबाग स्थानक कचऱ्यात घालवल्याच्या चर्चा प्रवासीवर्गातून होताना दिसत आहेत.
अलिबाग एसटी बस स्थानकातून मुंबई, पुणे, बोरीवली, ठाणे, अक्कलकोट, शिर्डी बरोबरच पनवेल, पेण, रोहा, मुरूड तसेच गावे, वाड्यांपर्यंत एसटीची सेवा पोहचली जाते. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह नोकरी व्यवसायानिमित्त एसटीने ये-जा करणाऱ्यांची संख्या हजारोच्या पटीने आहे. प्रवाशांच्या चांगल्या आरोग्य आणि सुखसोयींसाठी एसटी महामंडळाने हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर स्थानक अभियान सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून रत्नागिरीपासून सोलापूरमधील एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अलिबाग स्थानकाला भेट देऊन स्वच्छतेची आणि येथील सुविधांची पाहणी केली. मात्र, या प्रवाशांच्या आरोग्याशी आगार व्यवस्थापन खेळ खेळत असल्याचे चित्र आहे. अलिबाग स्थानकाच्या आवारातच ठिकठिकाणी कचरा पडला असून, स्थानकात प्रवेश केल्यावर समोर कचऱ्याचा ढीगारा दिसून आला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास यंत्रणा उदासीन ठरली आहे. त्यामुळे स्थानकात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामध्ये प्लास्टीक पिशवी, कापडी बॅगा, दारुच्या बाटल्यांचा ढीगारा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अलिबाग आगार खड्ड्यासह कचऱ्यात गेले असून, एसटी महामंडळाचा स्वच्छतेचा दिखावा फक्त अभियानापुरता असल्याचे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.
ठेकेदार स्तुस्त
जिल्ह्यातील स्थानकातील कचऱ्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन व्हावे, परिसर स्वच्छ राहवा म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक स्थानकांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी एका खासगी कंपनीला ठेका देण्यात आला आहे. पुर्वी स्थानकातील स्वच्छता राखण्यासाठी सफाई कामगार होते. परंतु, आता त्यांच्या जागी खासगी ठेकेदाराला स्वच्छतेचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे ठेका देऊनही कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यास ठेकेदार अपयशी ठरल्याची चर्चा प्रवाशांमध्ये आहे. स्थानकात कचरा असूनदेखील ठेकेदार स्तुत्य असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कचऱ्याच्या ठेक्यासाठी केलेलेा खर्च वाया जात असल्याचे बोलले जात आहे.
अलिबाग स्थानकातील कचरा काढण्याचे काम खासगी ठेकेदाराला देण्यात आले आहे. स्थानकात कचरा पडून आहे. कचऱ्याची वाहतूक करणारे वाहन आले नसल्याने कचरा स्थानकात पडून आहे.
राकेश देवरे,
आगार व्यवस्थापक, अलिबाग






