| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील दामत गावात गोवंशीय जनावरांची कत्तल सुरु असताना नेरळ पोलिसांनी धाड टाकली आणि गोवंश मांस तसेच कत्तल करणारे तीन जणांना ताब्यात घेतले. नेरळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, त्यातील एक तरुण हा सराईत गुन्हेगार आहे.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मुस्लिम बहुल दामत गावात मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तल होत असल्याच्या तक्रारी सुरु होत्या. मात्र, मागील काही महिन्यात नेरळ पोलिसांच्या सतत होणाऱ्या कारवायांमुळे दामत गावातील गोवंश जनावरांची कत्तल होण्याचे प्रमाण घटले आहे. मात्र, तरीदेखील गोवंश जनावरांची कत्तल करण्याचे कोणतेही शासकीय परवाने नसताना देखील छुप्या पद्धतीने जनावरांची कत्तल सुरूच आहे. त्यामुळे अलर्ट मोडवर असलेल्या नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस यांना दामत गावात गोवंश कत्तल केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी ड्युटीवर असलेले नेरळ पोलिसांचे पथक रात्रीच्या वेळी दामत गावात पोहचले. त्यावेळी फुरकान परवेझ नजे याच्या गोठ्यामध्ये दोन गोवंश जनावरे यांची कत्तल करून त्याचे मांस बाजूला करण्याचे आणि अन्य कामे सुरु होती. त्यावेळी त्या ठिकाणी साधारण 140 किलो मांस, वजन काटा, लाकडी खांडणी, लोखंडी सुरे आणि कानस आदी साहित्य आढळून आले. या प्रकरणी नेरळ पोलिसांच्या पथकाने दामत गावातील फुरकान परवेज नजे (20), सलमान खुरशीद नजे (28), अखिल मुस्ताक नजे (34) यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली. दामत गावातील गोवंश जनावरे यांच्या कत्तल प्रकरणी नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्रीरंग किसवे करीत आहेत. या गुन्ह्यातील तिन्ही आरोपीना कर्जत न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.






