। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील वेणगाव या ठिकाणी लोखंडी हत्याराच्या साहाय्याने एका व्यक्तीच्या घरात घुसून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. पहाटेच्या सुमारास काही हल्लेखोरांनी घरात घुसून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोघा भावांना चॉपरने भोसकून, कोयता व बंदुकीचा धाक दाखवत गंभीर मारहाण करण्यात आली. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, धाकटे वेणगाव येथे ही घटना घडली असून, हा हल्ला दोन सख्ख्या चुलत भावांतील वादातून झाला असल्याची शक्यता आहे. किरकोळ वाद विकोपाला जाऊन दोन्ही कुटुंबांमध्ये वैर निर्माण झाले आणि त्यातूनच हा जीवघेणा हल्ला घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या घटनेने धाकटे वेणगाव परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, काही दिवसांपूर्वीच कर्जत तालुक्यात भावकीच्या वादातून गोळीबाराची घटना घडली होती. त्यामुळे अशा सलग हिंसक घटनांनी तालुक्यात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात त्यांचे वडील प्रफुल्ल शिंदे आणि आई प्रतिभा शिंदे देखील जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण शिंदे, मंगेश जाधव रा. धाकटे वेणगाव, जय साबळे रा. करंजाडे, पनवेल आणि त्यांच्यासोबतचे दोन अनोळखी व्यक्ती पहाटे घराचा दरवाजा तोडून आत शिरले. घरात झोपलेल्या शिंदे कुटुंबियांवर त्यांनी चॉपर, मोठा कोयता आणि रिव्हॉल्व्हच्या मुठीने हल्ला चढवला. काही मिनिटांतच परिसरात आरडाओरड झाला आणि आरोपी कारमध्ये बसून पळून गेले. या घटनेत तक्रार प्रतीक ऊर्फ छोटू प्रफुल्ल शिंदे (28) आणि त्याचा भाऊ सतिश शिंदे हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कल्याण आणि उल्हासनगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लटपटे अधिक तपास करीत आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून पोलिसांनी चोपर, कोयता, बंदूक ताब्यात घेतले आहेत.







