| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत स्थापन केलेल्या दक्षता व नियंत्रण समितीची बैठक पेण उपविभागीय अधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकित जिल्हाधिकारी यांनी आदेशीत केलेल्या 1 ते 47 मुद्यांतील अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा करून मुद्देनिहाय कारवाई केली जाईल, असे आदेश पारित करण्यात आले. तसेच, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे होऊ नये यासाठी सामाजिक स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन कायद्याच्या महत्वांचा प्रसार व प्रचार करण्यात येणार असून सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी यात सहभागी करून वाडी वस्तीत जाऊन जनजागृती करण्यात येणार असल्याचे बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर विविध विषयांवर देखील सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीला पोलीस उप अधीक्षक जालंधर नालकूल, गट विकास अधिकारी गजानन लेंडी, नायब तहसीलदार रश्मी साळुंखे, प.स. कनिष्ठ सहाय्यक नवनीत पाटील, महामुख्य सहाय्यक सुनिल सुरवाडे, विकास गावंड, उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे संजय सोनावणे, विजय जाधव, चंद्रकांत अडसुळे, प्रदिप जाधव, उमेश दोरे, भुषण वाघमारे व जोमा दरवडा हे उपस्थित होते.






