पाईपलाईन फुटण्याच्या घटना वाढल्या
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग शहर व परिसरात सुरु असलेल्या भूमिगत विद्युत केबलच्या कामांमुळे पाईपलाईन फुटण्याचे प्रकार वाढू लागले आहे. यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने ऐन उन्हाळ्यातच नागरिकांना मुबलक पाण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे.
सतत विद्युततारा तुटणे, पोल पडणे, वाकणे अशा अनेक कारणांमुळे विद्युत सेवा खंडीत होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांसह वेगवेगळ्या व्यावसायिकांना होत आहे. ही समस्या कायमची सोडविण्यासाठी भूमिगत विद्युत केबल टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत अलिबाग शहर, चेंढरे ग्रामपंचायत, वरसोली ग्रामपंचायतमधील काही भागात अंतर्गत उपरी तार मार्गाचे रुपांतर भूमिगत केबलमध्ये केले जाणार आहे. गेल्या दोन वर्षापासून या भूमिगत केबलचे काम सुरु आहे. अलिबाग शहरात ठिकठिकाणी केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरु केले आहे. या खोदकामामुळे शहरातील पाण्याची पाईपलाईन फुटण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. शहरातील रामनाथ येथे चार वेळा, मारुती नाका, टॉकीज या परिसरात प्रत्येकी एक वेळा अशा पाच ते सात वेळा मुख्य पाईपलाईन फुटण्याची घटना झालेली आहे. तसेच दहा-पंधरा वेळा नळ कनेक्शन तुटले आहे.
अलिबाग शहराला एमआयडीसीमार्फत पाणी पुरवठा होत आहे. परंतु या फुटण्याच्या प्रकाराने अलिबागकरांना मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. अनेक वेळा अलिबागकरांना दोन ते तीन दिवस पाण्याची प्रतिक्षा करावी लागत आहेत.
विद्युत केबलचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. खोदकाम करताना पाईपलाईन फुटण्याच्या होण्याची समस्या आहे. परंतु तात्काळ त्या दुरुस्त करून पूर्ववत सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. केबलमुळे विजेचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे. शहरातील पाईपलाईन जुनी आहे. ती कशाप्रकारे टाकलेली आहे याची माहिती कुणालाच नसल्याने खोदकाम करताना असे प्रकार घडत आहेत.
सुनीलकुमार साह- प्रकल्पप्रमुख
शहरात सुरु असलेल्या भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामामुळे अनेक ठिकाणी पाण्याची लाईन तुटण्याचे प्रकार घडत आहेत. ज्या तत्परतेने तुटलेले पाईप जोडण्याचे काम व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाहीत. शहरातील नागरिकांनी देखील पाण्याची लाईन तुटल्यावर त्वरित तक्रार करणे गरजेचे आहे. तसेच नवीन टाकण्यात येणारी विद्युत केबल कमीत कमी तीन फूट खोल असणे आवश्यक आहे. तरी नागरिकांनीदेखील दक्ष राहून सहकार्य करावे. तक्रारीसाठी 7507971476 ( जमाल सय्यद ) यांच्याशी संपर्क साधावा.
प्रशांत नाईक, माजी नगराध्यक्ष, अलिबाग