अलिबाग-वावे एसटी बससेवा सुरु

माजी आ. पंडित पाटील यांच्या प्रयत्नांना यश

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग-वावे मार्गावरील प्रवाशांसह बामणगाव शाळेतील विद्यार्थ्यांची एसटीअभावी गैरसोय झाली होती. माजी आ. पंडित पाटील यांच्या प्रयत्नाने अलिबाग-वावे एसटी बससेवा सुरु करण्यात आली आहे. त्यांच्या मागणीची दखल घेत एसटी महामंडळ रायगड विभागाने कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांकडून पंडित पाटील यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

अलिबाग-रोहा मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. अलिबागमध्ये मोठ्या संख्येने नोकरी-व्यवसायासह शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. अलिबाग व रोहा आगारातून एसटी बसेस आहेत. मात्र, अलिबाग-वावे मार्गावरील बामणगाव, उसर, खानाव, घोटवडे, कावीर, सहाण, सहाणगोठी आदी गावांतील शेकडो विद्यार्थी व प्रवाशांची एसटीअभावी मोठी गैरसोय होत आहे. एसटी पास काढूनदेखील बामणगाव शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे त्यांची मोठी आर्थिक हानी होत आहे. अनेकवेळा खासगी वाहनांचा आधार घेत या मार्गावरील प्रवासी व विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. ही बाब पंडित पाटील यांच्या निदर्शनास आली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ यासाठी त्यांनी सोमवार ते शुक्रवार या कालावधीत अलिबाग-वावे एसटी बस सुरू करावी, अशी मागणी एसटी महामंडळ रायगड विभाग नियंत्रक यांच्याकडे केली होती.

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वावे-अलिबाग व सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास अलिबाग-वावे एसटी बस सुरु करावी, असे निवेदनाद्वारे त्यांनी सांगितले होते. या मागणीची तात्काळ दखल घेण्यात आली. पंडित पाटील यांच्या मागणीनुसार अलिबाग-वावे एसटी बस सुरु करण्यात आली आहे. याबाबत एसटी महामंडळाकडून पंडित पाटील यांना बससेवा सुरू करण्याचे पत्र देण्यात आले आहे.

Exit mobile version