| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील खांब-पालदाड अंतर्गत रस्त्यापैकी देवकान्हे ते धानकान्हे रस्त्यावर पडलेली ग्रीक तरूणांनी हातात झाडू घेऊन साफ केल्याने संभाव्य अपघाताचा धोका टळला आहे.
मागील दोन महिन्यांपूर्वी खांब-पालदाड अंतर्गत रस्त्यापैकी देवकान्हे ते खांब या रस्त्याचे पक्के डांबरीकरण करून रस्ता सुस्थितीत करण्यात आला. त्यानंतर त्यावर टाकलेले कार्पेट अधिक मजबूत होण्यासाठी कार्पेटवर ग्रीटचा थर टाकण्यात आला होता. कालांतराने हळूहळू वाहनांच्या वर्दळीने टाकलेले ग्रीट आपोआप रस्त्याच्या कडेला दुतर्फा पसरले. परंतु, ज्या भागात रस्ता रस्ता वळणाचा आहे, तिथे मात्र पसरलेले ग्रीट जसेच्या तसे रस्त्यावरच राहिले. ग्रीट असलेल्या भागातून वाहने चालवताना अतिशय सावधगिरी बाळगावी लागत होती. याशिवाय या वळणाच्या ग्रीट पसरलेल्या भागातून कित्येक बाईकस्वार व सायकलस्वार घसरून पडल्याने अपघाताच्या घटना घडल्या आहेत. वळणावर पसरलेले ग्रीट दूर करणे गरजेचे असल्याने धानकान्हे येथील सामाजिक क्षेत्रात नेहमीच कार्यरत असणाऱ्या गावदेवी क्रीडा मंडळाच्या तरूणांनी पुढाकार घेऊन व हातात झाडू घेऊन वळवावरील धोकादायक ग्रीट हटवल्याने संभाव्य अपघाताचा धोका तर टळला असल्याने तरूणाईच्या या सत्कार्याचे वाहनचालक व दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून कौतुक करण्यात येत आहे.