| अलिबाग | प्रतिनिधी |
पर्यावरण संवर्धनाचा विचार फक्त शब्दांत नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून जगभर पसरवणाऱ्या अलिबागच्या पर्यावरणस्नेही उद्योजिका विद्याताई वसंत पाटील यांचे आज सकाळी 8.30 वाजता पुणे येथे निधन झाले.
पर्यावरण संवर्धनाचा विचार फक्त शब्दांत नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून सर्वत्र पसरवणाऱ्या अलिबागच्या पर्यावरणस्नेही उद्योजिका विद्याताई वसंत पाटील यांचे आज सकाळी 8.30 वाजता पुणे येथे निधन झाले. त्या 78 वर्षांच्या होत्या. अल्पशा आजारानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती पाटील कुटुंबीयांनी दिली. विद्याताई पाटील यांनी पर्यावरण संवर्धनाचा विचार आपल्या आयुष्याच्या सुरुवातीपासून जपला. त्यांचे जीवनकार्य हे फक्त व्यवसायापुरते मर्यादित नव्हते; तर त्यांनी जाणीवपूर्वक पर्यावरणपूरक मार्ग निवडून समाजाला आदर्श घालून दिला. ‘पर्यावरण वाचलं तरच आपलं जगणं सुरक्षित राहील’ हा त्यांचा ठाम विश्वास. याच विचारातून त्यांनी अलिबागमध्ये मयूर बेकरी या नावाने बेकरीची स्थापना केली. त्या काळात प्लास्टिकचा वाढता वापर ही मोठी समस्या होती. पण विद्याताई यांनी सुरुवातीपासूनच प्लास्टिकला पर्याय म्हणून कागद, कपडा आणि नैसर्गिक पॅकिंगचा अवलंब केला. त्यामुळे मयूर बेकरी हा व्यवसायच नव्हे तर समाजातील पर्यावरण-जागृतीचा केंद्रबिंदू बनला. पर्यावरण संवर्धनासह विद्याताई यांचा सामाजिक सहभागही मोठा होता. स्थानिक महिला गट, स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थी यांच्या माध्यमातून त्यांनी वृक्षारोपण, प्लास्टिकविरहित उपक्रम, हरित जनजागृती अशा अनेक मोहिमा राबवल्या. त्यांचे मार्गदर्शन हे अनेक तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरले. त्याचे पार्थिव दुपारी 4 वाजता अलिबाग येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्यानंतर त्याची अंत्ययात्रा संध्याकाळी 6 वाजता काढण्यात आली. अलिबाग येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.







