अलिबागचे बालकलाकार राज्य नाट्य स्पर्धेत चमकणार

दोन बालनाट्य राज्य स्पर्धेत; नवी मुंबईला प्राथमिक फेरी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग चेंढरेमधील रंगसेवा सांस्कृतिक मंडळ प्रस्तुत कोर्‍या पाटीवर आणि कलारंग प्रस्तुत विजय सत्याचा ही दोन बालनाट्य 19 वी महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धा 2022-23 साठी प्राथमिक फेरीत सहभागी होत आहेत. कोर्‍या पाटीवर बाल नाट्याचा गुरुवारी 5 तर शुक्रवारी 6 जानेवारी रोजी विजय सत्याचा प्रयोग नवी मुंबई येथे साहित्य मंदिर सभागृहात होणार आहेत. राज्य बाल नाट्य स्पर्धा 3 ते 7 जानेवारी या दरम्यान संपन्न होणार आहे. अलिबागमधील बाल कलाकार आपली कला बाल नाट्यातून सादर करणार आहेत.

चेंढरे सांस्कृतिक व क्रीडा मंडळ मार्फत चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील मुलासाठी नाट्य शिबिर व विकास कौशल्य उपक्रम राबविण्यात येतो. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना कलेची आवड निर्माण व्हावी यादृष्टीने हा उपक्रम राबविला जातो. चेंढरे सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या माध्यमातून शिबिराला येणार्‍या मुलाचे बाल नाट्य बसविण्यात आले आहे. लेखक किशोर म्हात्रे आणि सागर नार्वेकर यांच्या कलारंग आणि रंगसेवा मंडळामार्फत कोर्‍या पाटीवर आणि विजय सत्याचा ही दोन बालनाट्य बसविण्यात आली आहेत.

कोर्‍या पाटीवर यामध्ये 18 तर विजय सत्याचा मध्ये 7 मुलांनी आपला अभिनय सादर केला आहे. कोर्‍या पाटीवर मध्ये प्रसिध्दी पासून कंटाळलेल्या बालकांची कथा दाखविण्यात आली आहे. तर विजय सत्याचा बालनाट्यमध्ये सत्याची कास धरल्याने आपलाच विजय होतो याचे सादरीकरण केले आहे. भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये राज्य नाट्य स्पर्धेपूर्वी सोमवारी दोन्ही नाटकांची रंगीत तालीम प्रयोग उपस्थितांसमोर सादर केला. त्यानंतर नाटकातील बाल कलाकार, लेखक, दिग्दर्शक, संगीतकार, नृत्य दिग्दर्शक, गायक, आणि इतर बॅक स्टेज कलाकारांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. चेंढरे सांस्कृतिक व क्रीडा मंडळ अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, माजी सदस्या प्रियदर्शनी पाटील, चेंढरे सरपंच, उपसरपंच, यतीन घरत तसेच पालक, प्रेक्षक या रंगीत तालीम नाट्य प्रयोगाला उपस्थित होते.

Exit mobile version