ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धा

पी. व्ही. सिंधूची आगेकूच; प्रणोय, कश्यप सलामीलाच गारद

| लंडन | वृत्तसंस्था |

भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला दिवस संमिश्र यशाचा ठरला. एकीकडे प्रतिस्पर्धी खेळाडूने माघार घेतल्यामुळे पी. व्ही. सिंधूला महिला एकेरी विभागाच्या लढतीत आगेकूच करता आली, तर दुसरीकडे एच. एस. प्रणोय व आकर्षी कश्यप यांना एकेरी विभागात पराभवाच्या नामुष्कीचा सामना करावा लागला. त्यामुळे दोन्ही खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले.

दुखापतीवर मात करीत काही दिवसांपूर्वीच बॅडमिंटन कोर्टवर पुनरागमन करणाऱ्या पी. व्ही. सिंधू हिच्यासमोर सलामीच्या लढतीत योन ली हिचे आव्हान होते. भारताच्या फुलराणीने पहिला गेम 21-10 असा जिंकत 1-0 अशी आघाडी मिळवली.त्यानंतर योन ली हिने माघार घेतली. त्यामुळे सिंधूला या स्पर्धेत पुढे चाल देण्यात आली. आता पुढील फेरीत तिला कोरियाची अव्वल मानांकित ॲन सी यंग हिचा सामना करावा लागणार आहे.

झुंज अपयशी
पुरुषांच्या एकेरीत एच. एस. प्रणोय याने सलामीच्या लढतीत कडवी झुंज दिली; पण त्याचे प्रयत्न अपयशी ठरले. सु ली यांग याने प्रणोणचा कडवा संघर्ष तीन गेममध्ये मोडून काढला व पुढे पाऊल टाकले. प्रणोय याने पहिला गेम 21-14 असा जिंकत आघाडी मिळवली. त्यानंतर मात्र यांग याने झोकात पुनरागमन करताना 21-13, 21-13 अशी बाजी मारली. प्रणोय याचा एक तास व सात मिनिटांत पराभव झाला.
महिला एकेरीत निराशा
पी. व्ही. सिंधू हिला आगेकूच करता आली असली तरी महिला एकेरीत भारताला निराशेला सामोरे जावे लागले. आकर्षी कश्यप हिचे आव्हान संपुष्टात आले. पेई यू पो हिने आकर्षीवर 21-16, 21-11 असा दोन गेममध्ये विजय मिळवला. तिने आकर्षीवर 37 मिनिटांत मात केली.
Exit mobile version