सर्वच पक्ष आगामी निवडणुकीच्या रणांगणात

सध्या निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या सर्वच पक्षांची चढाओढ पाहायला मिळत आहे. सर्वांचेच जोरदार प्रयत्न सुरु असलेले दिसत आहेत.

नगरपंचायत मतदानासाठी माणगाव प्रशासन सज्ज
पोलीस बंदोबस्तात होणार मतदान
। माणगाव । प्रतिनिधी ।
संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष वेधून राहिलेल्या माणगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 13 जागांसाठी आज मंगळवारी होत असून या निवडणुकीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान होणार असून सर्वत्र प्रशासन सज्ज झाले आहे. 13 वार्डातील होणार्‍या या निवडणुकीसाठी एकूण 10751 इतके मतदार असून त्यामध्ये पुरुष मतदार 5582 तर स्त्री मतदार 5169 इतके आहेत. शहरातील चौदा मतदान केंद्रातून ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
माणगाव नगरपंचायतीत एकूण 17 वार्ड असून 17 नगरसेवक पदाची संख्या असून वार्ड क्र.6 , 8,14 व 17 हे ओबीसीसाठी आरक्षित झाल्याने या वार्डांची 21 डिसेंबरला होणारी निवडणूक प्रक्रिया न्यायालयाच्या सूचनेनुसार थांबविण्यात आली होती. या चार वार्डांच्या निवडणुका आता 18 जानेवारीला होणार असून उर्वरित 13 वार्डांच्या निवडणुका मंगळवारी होत आहेत. या सर्व 17 वार्डांची मतमोजणी मात्र 19 जानेवारी रोजी होणार आहे. गेली आठ दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व माणगाव विकास आघाडीकडून प्रचार सभेत आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झाडल्या गेल्याने या निवडणुकीची रंगत आता वाढली आहे. यामध्ये कोण बाजी मारणार ते 19 जानेवारीला मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. या माणगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी होणार्‍या मतदानाकरिता 4 पोलीस अधिकारी, 55 पोलीस कर्मचारी व तीन होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली आहे.


पालीत जनमतात आघाडीचे पारडे जड
13 पैकी 13 जागा जिंकणार; कार्यकर्त्यांसह नेतेमंडळींना विश्‍वास
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पाली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 ची रणधुमाळी जोरात सुरू आहे. शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी पाली नगरपंचायत निवडणूकीला एकत्रितपणे सामोरे जात आहेत . सुधागड तालुक्यात शेकाप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्मक दृष्ट्या आघाडीवर आहेत, आघाडीच्या माध्यमातून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत या दोन्ही पक्षांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. नगरपंचायत निवडणुकीत आघाडीचे एकीचे बळ कामी येणार आहे. जन मानसातून आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने पाली नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष आघाडीचाच असेल असा सूर राजकीय विश्‍लेषक व जाणकार व्यक्त करीत आहेत.
पाली शहराचा सर्वांगीण व शाश्‍वत विकास घडविण्याची धमक प्रचंड विकासदृष्टी असलेल्या शेकाप राष्ट्रवादी आघाडीतच असल्याची भावना जन मानसातून व्यक्त होत आहे. पाली नगरपंचायत निवडणुकीत शेकाप राष्ट्रवादी वगळता अन्य शिवसेना, भाजप, रिपाइं स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे शेकाप राष्ट्रवादी आघाडीचे सर्वच्या सर्व 13 प्रभागात वर्चस्व दिसून येत आहे. पाली नगरपंचायतीवर शेकाप राष्ट्रवादी आघाडीची निर्विवाद सत्ता प्रस्थापित होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून जनमतात आघाडीचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. पाली नगरपंचायत निवडणुकीत शेकाप राष्ट्रवादी आघाडीला घवघवीत यश मिळणार असून 13 पैकी 13 जागा जिंकण्याचा कार्यकर्त्यांसह नेतेमंडळींनी विश्‍वास दर्शविला आहे.
आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पालकमंत्री आदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे, माजी आ.धैर्यशील पाटील , ज्येष्ठ नेते वसंतराव ओसवाल, खा. सुनिल तटकरे मैदानात उतरले आहेत. आघाडीच्या दमदार प्रचार रॅली व सभांच्या माध्यमातून राजकीय वातावरण ढवळून निघाले. पालीचा मतदार सूज्ञ आहे. जनता आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देईल असा विश्‍वास आ.तटकरे यांनी व्यक्त केला. ना. आदिती तटकरे म्हणाल्या की अष्टविनायक तीर्थक्षेत्राचा विकास करताना जनतेला मूलभूत व पायाभूत नागरि सेवासुविधा पुरविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. सुधागड तालुका क्रीडा संकुल, तसेच प्रस्तावित ग्रामीण रुग्णालय, अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखडा, नागरिकांना मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा, रोजगार निर्माणावर भर, शहरातील अंतर्गत रस्ते, पार्किंग व्यवस्था, भाविक व भक्तांना चांगल्या सोयीसुविधा आदी लोकाभिमुख विकासकामांना प्राधान्य देण्याची भूमीका घेऊन आम्ही निवडणूक लढवीत आहोत. त्यामुळे जनता विकासाला प्राधान्य देऊन शेकाप राष्ट्रवादी आघाडीला सत्तेत संधी देईल असा विश्‍वास आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.


ममता थोरेंचा विजय निश्‍चित
खा.सुनील तटकरे यांचे सुतोवाच
। माणगाव । प्रतिनिधी ।
भाजपची माणसे आपली कमळ निशाणी घेऊन उभे राहू शकत नाही येथेच ममता थोरे यांचा विजय निश्‍चित असल्याचे प्रतिपादन खा.सुनील तटकरे यांनी माणगाव उतेखोल गावात झालेल्या जाहीर सभेत बोलताना व्यक्त केले.
माणगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी वार्ड क्र.4 च्या शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार ममता कुंडलिक थोरे यांच्या प्रचारार्थ खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन शुक्रवारी उतेखोल गावात करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना खा.सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, उमेदवार ममता थोरे ,माणगाव पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर, माजी उपसरपंच अनंता थळकर, माणगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे सभापती निलेश थोरे, सुमित काळे, अलिबाग पंचायत समिती सदस्या रचना थोरे, कृउबा समिती सभापती संजय पंदेरे, शेकाप तालुका सहचिटणीस राजेश कासारे, उणेगाव सरपंच राजेंद्र शिर्के, माजी नगरसेवक नितीन वाढवळ, जयंत बोडेरे, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक थळकर, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष सौरभ चांदोरकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना खा.तटकरे पुढे म्हणाले कि, विकासासाठी याठिकाणी शेकाप व राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असतानाही आघाडीतील मित्रपक्षाला भाजपची सोबत का करावी लागली असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. गावातील वाकडाई देवीचे मंदिर आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे. आपण माणगावकर ठेकेदारी करणार्‍या माणसाच्या हातात हे शहर देणार कि विकासाला चालना देणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस व शेकापच्या ताब्यात देणार असा सवाल करून ममता थोरेंना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन केले.


पोलादपूरमध्ये ना.अदिती तटकरेंचा झंझावाती प्रचार
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
तालुक्याच्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांमध्ये नागरिकांच्या अपेक्षांना कोण पुरे पडले अन् कोण भुलथापा मारतेय, हे स्पष्टच आहे. पुरस्थितीमध्ये पोलादपूर शहराची अवस्था बिकट झाली असताना पालकमंत्री म्हणून आघाडी सरकारची प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना जॅकवेलसाठी तसेच आपत्तीनिवारणासाठी केलेल्या प्रयत्नांवेळी पोलादपूरकर जनतेने हे पाहिले आणि अनुभवले आहे, असे सूचक उद्गार रायगडच्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांनी काढले. गेल्या तीन दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्य असताना पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांनी पोलादपूर येथे आघाडीच्या उमेदवारांसाठी झंजावाती प्रचारफेरी काढली.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारानंतर प्रभाग 17 चे काँग्रेस उमेदवार दिलीप भागवत यांच्या प्रचारक कार्यालयामध्ये पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांनी छोटेखानी सभा घेतली असता ना.तटकरे बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, काँग्रेस तालुकाअध्यक्ष अजय सलागरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर तथा बाबू खानविलकर, उपसभापती शैलेश सलागरे, शहरअध्यक्ष अमोल भुवड, उपसभापती शैलेश सलागरे, कृष्णा कदम, जिल्हा महिला काँग्रेस सरचिटणीस शुभांगी चव्हाण, शहर अध्यक्ष सचिन दुदुस्कर, विभागीय अध्यक्ष उस्मान करबेलकर, आदी मान्यवर उपस्थित होते.


प्रचाराची रणधुमाळी थंडावली
। तळा । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यात 6 नगरपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया आज होत आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून पुढील भेटीगाठीला जोर आला आहे. तर काही ठिकाणी मटण, चिकन पार्टी होत असल्याचे चित्र पहियला मिळत आहे.
जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, शेकाप, मनसे हे प्रमुख पक्ष आहेत. राज्यात आघाडी सरकार असल्याने वरिष्ठ पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्रित लढण्या बाबत बोलले जात होते. मात्र जिल्ह्यात असे चित्र दिसत नाही. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पाली, माणगाव, तळा, म्हसळा, खालापूर, माणगांवमध्ये सोयीनुसार काँग्रेस आणि इतर पक्षासोबत आघाडी तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही स्वबळावर सत्ता खेचून आणण्यासाठी तटकरे कुटूंब प्रचारात रंगले होते. काँग्रेस हा आघाडी आणि युतीमध्ये नशीब आजमावत आहे. तळा नगरपंचायत मोठ्या प्रतिष्ठेची समजली जाते. सेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी आणि शेकाप, बहूजन वंचितआघाडी ही स्वबळावर निवडणूक लढवित आहे. एकंदरीत आज होणार्‍या मतदानावेळी मतदार राजा हा कोणाला कौल देणार हे दि.19 जानेवारी रोजी कळणार आहे.

Exit mobile version