उद्योजक राजू पिचिका यांच्या समर्थनार्थ सर्व पक्ष एकत्र

| पेण | प्रतिनिधी |

तालुक्यातील सेझच्या जमीनीचा वापर अकृषक वापरासाठी करत असल्याचा आरोप येथील रामेश्वर कस्ट्रक्शनचे मालक राजू पिचिका यांच्यावर करण्यात आला होता. सर्व आरोप खोटे असल्याने पिचिका यांच्या समर्थनासाठी विविध राजकीय पक्षाचे नेते सोमवारी रस्त्यावर उतरले होते.

पिचिका यांच्या विरूध्द पेण शहरातील महेश पोरे या व्यक्तीने लेटरपॅडचा वापर करून बिनबुडाचे आरोप केले होते. याबाबात महसुल विभाग, मुख्यमंत्री यांच्याकडे देखील सदरचे पत्र दिले होते. परंतु सत्यता काही वेगळीच होती. उद्योजक पिचिका हे आपल्या व्यवसायासाठी वापरत आलेली जमिन ही एन.ए केलेली आहे. कोणत्याही प्रकारे शासनाचा महसूल बुडविलेला नाही. मात्र, पिचिका यांना त्रास देण्याच्या दृष्टीने हे षडयंत्र सुरू असल्याचे पिचिका यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांच्या लक्षात आले. त्यांनी पेण तालुक्यासह रायगड जिल्हयातील लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या व पिचिकांना पोरे हे त्रास देत असल्याची माहिती दिली. त्या वेळेला सर्व पक्षिय लोकप्रतिनिधी एकत्रीतपणे दि.5 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक निवेदन दिले. दि.6 रोजी पोलिस अधिक्षक रायगड यांनाही पत्र दिले होते. तसेच, पेणचे आमदार रविंद्र पाटील यांनी देखील पोरे यांच्याविरूध्द कठोर कारवाई करण्याबाबत पोलिस अधिक्षकांना दि.16 रोजी पत्र दिले आहे.

सोमवारी विविध राजकीय पक्षाचे नेते राजू पिचिका यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरून पेण पोलिस ठाणे, पेण तहसिल, आणि पेण उपविभागीय परिवहन कार्यालयात गेले. पोलिस अधिक्षकांकडून आलेल्या पत्रावर काय कारवाई केली. याविषयी विचारणा केली. पोरे यांच्याविरूध्द कठोरातील कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. तर, तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी सांगितले, की पोरे यांच्या विषयी सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल. तसेच, उपविभागीय परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी सांगितले की, आजपर्यंत पोरे यांनी माहितीच्या अधिकाराखाली कार्यालयात किती माहिती मागीतली याचा तपशील घेतला जाईल व त्याबाबत पोलिस अधिक्षकांना कळविण्यात येईल. यावेळी शेकापक्षाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव दिवेकर, पंचायत समिती सदस्य निलकंठ दिवेकर, सावरसई सरपंच योगेश दिवेकर, भाजपकडून मा. सभापती डी.बी.पाटील, नगरसेवक शोमेर पेणकर, काँग्रेसकडून अशोक मोकल, राष्ट्रवादीकडून निवृत्ती पाटील, विकास पाटील, शिवसेना शिंदे गट जिल्हा अध्यक्ष संजय पाटील, सरपंच नरेंद्र पाटील, सरपंच स्वप्निल म्हात्रे, सरपंच गोरख म्हात्रे, डोलवी सरपंच परशूराम म्हात्रे यांच्यासह सर्व पक्षीय नेते तसेच 500 च्यावर रामेश्वर कंस्ट्रक्शनचे कामगार उपस्थित होते.

पोरे हे स्वतःच्या नावा आधी डॉक्टर असे लिहतात. याची चौकशी करावी अशी, मागणीही पेणमधील काही पत्रकारांनी केली आहे.दरम्यान, महेश पोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Exit mobile version