शेकापमुळेच अलिबागचा सर्वांगिण विकास

आ. जयंत पाटील यांचे प्रतिपादन, नारंगी येथे विकासकामांचे भूमिपूजन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड आणि रायगड जिल्हा परिषद तसेच अलिबाग तालुका हा वेगळा पॅटर्न आहे. अलिबाग तालुक्याच्या विकासाची सूत्रे ही नियमामध्ये नसतानाही ते बदलण्याची हिम्मत शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून ज्येष्ठ स्व. प्रभाकर पाटील यांनी केली असल्याचे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी रविवारी (दि.16 जानेवारी) नारंगी येथे केले. तालुक्यातील खारेपाट विभागातील नारंगी येथील रस्त्याला स्व. गजानन पुरुषोत्तम दातार यांचे नाव देण्यात आले. त्याच्या नामफलकाचे अनावरण माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार पंडित पाटील, जि.प.सदस्या भावना पाटील, माजी उपसभापती प्रमोद पाटील, सरपंच राजाराम गावंड, नारंगी सरपंच स्मीता सतीश पाटील, श्रीराम दातार, वासंती भीडे, हाशिवरे सरपंच संध्या पाटील, माजी उपसभापती अनिल गोमा पाटील, विश्‍वस्त नरहरी म्हात्रे, माजी सरपंच सिद्धनाथ पाटील, उपसरपंच अमोल पाटील, शिरवली सरपंच प्रमोद ठाकूर, नरेश म्हात्रे आदी उपस्थित होते.


आ. जयंत पाटील पुढे म्हणाले की, गजानन दातार काका आणि नारंगी गाव हे वेगळे नाते होते. नारंगी गाव हे दातारांचे गाव म्हणून आम्ही सगळे ओळखतो. साामजिक बांधिलकी आणि विशेषतः विकासाच्या बाबतीत दातार काकांनी केलेले काम विसरता येणार नाही. हा रस्ता करण्यास बराचसा कालावधी लागला. जागा मिळत नव्हती. तत्कालिन मंत्री मीनाक्षी पाटील यांनी विशेष बाब म्हणून जागा संपादन करुन मंत्री म्हणून हा रस्ता केला. गावाची ग्रामपंचायत वेगळी करण्याचा विक्रम त्यांनी केला. 1991 साली सुधाकर नाईक मुख्यमंत्री असताना 500 लोकसंख्या असलेल्या गावातच ग्रामपंचायत करण्याचा कायदा करण्यात आला होता. प्रस्थापित आमदारांना मोठया ग्रामपंचायती हव्या असतात. बजेट हवे असते. मात्र दातारांनी तत्पूर्वी 365 इतकी कमी लोकसंख्या असलेली महाराष्ट्रातील सर्वात लहान ग्रामपंचायत करण्याचा विक्रम त्यांनी केला. सामाजिक कार्यात आपण सातत्य ठेवले. व्यक्तिगत स्वार्थ ठेवला नाही. सामाजिक बांधीलकी ठेवून काम केले तर कामं होऊ शकतात. दातार काकांच्या निधनाचे वृत्त कळताच वाईट वाटले. नवीन पिढीला दातार काका समजले पाहिजेत म्हणून तातडीने आपण हा कार्यक्रम घेतला. कोण दातार, त्यांचे नाव का दिले? हे समजायला हवे. हे गाव आदर्श पेक्षाही अधिक आदर्श झाले पाहिजे. त्यासाठी आपण निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आ. जयंत पाटील यांनी दिली. या गावातील क्राँक्रीट रस्ते पुन्हा करा. वाचनालय अद्ययावत करु. आधुनिक वाचनालयात सर्व सुविधा सुरु करु. संगणक उपलब्ध करुन देऊ. हे सर्व काम तीन महिन्यांच्या कालावधीत पुर्ण करा. गाव वेगळे व्हायला हवे. त्यासाठी आपण स्वतः येऊन हे काम पुर्ण करुन तरच दातार काकांना खरी श्रद्धांजली ठरेल. पाणी पुरवठा योजना ताबडतोब पुर्ण करा. पुढल्या एक वर्षांनी दातार काकांची पुण्यतिथी साजरी करताना गावामध्ये फरक जाणवला पाहिजे अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली. जयंत पाटील पुढे म्हणाले की, प्रत्येकाने व्यवस्थित कामे केली तर काही वर्षांनी गावातील कोणतेच काम शिल्लक राहणार नाही. त्यानंतर आपल्याला व्यक्तिगत कामे करावे लागतील. त्याचाही पॅटर्न आपल्याकडे तयार आहे,असेही त्यांनी सुचित केले.


आमची कामे जनहितासाठी
आपण आणि बाकीची लोकं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आपली बांधीलकी वेगळी आहे. आपली काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आणि आपण जे काम करतो ते जनहितासाठी आणि प्रामुख्याने गरीब, कष्टकरी जनतेसाठी काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version